
मुख्यमंत्र्यांना राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले फार कंजूस माणूस…
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केले नाही. ठाकरेंच्या भाषणात विकासाचा मुद्दा आला असता तर मी एक हजार रुपये देणार होतो. पण, त्यांनी माझे एक हजार वाचवले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.
याला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस फार कंजूस आहेत. फडणवीस यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. परंतु, फडणवीस हे गौतम अदानी यांची दलाली करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे फार कंजूस माणूस आहेत. फडणवीसांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. पेशवे हे दिलदार माणसं होती. त्यातील एक म्हणजे नाना फडणवीस. उद्धव ठाकरेंसोबत फडणवीसांनी एक हजार रुपयांची पैज लावली. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. ठाकरे शेतकऱ्यांच्या बोलताना देवेंद्रजी कानात बोळे घालून बसले होते. एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी, कर्जमाफी कशी व्हावी, यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. त्यासह फडणवीस हे ओल्या दुष्काळाबाबत कशी फसवणूक करताय, याबद्दल त्यांच्या तोंडावर त्यांचे पत्र उद्धव ठाकरेंनी फेकून मारले, असे राऊत यांनी म्हटले.
गौतम अदानींच्या माध्यमातून मुंबईसह अन्य शहरांची कशी वाट लावली जात आहे, हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. हा विकासाचाच मुद्दा आहे. तुम्ही अदानींना मुंबई विकत आहात. अदानी मुख्यमंत्र्यांना 25 टक्के दलाली देतात. हे कमिशनचे मुख्यमंत्री आहेत. अदानींना कमरेवर घेऊन फिरावे ही यांच्या विकासाची व्याख्या आहे का? उद्धव ठाकरेंनी भाजपचा बुरखा पडला. देवेंद्र फडणीस यांना सत्य ऐकण्याची सवय नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
कालच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणार प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेल. उद्धव ठाकरेंनी माझे 1 हजार रुपये वाचवले. मी आवाहन केलं होतं, की उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही. परंतु मी पत्रकारांकडून माहिती घेतली. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही. त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.