
जिल्हा बँक भरती आणि दगडी बँक प्रकरण गाजतेय !
राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेतील २२० कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी दिली आहे. मात्र याच मुद्द्यावर बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले आहे.
ही भरती होत आहे ही स्वागतार्ह बाह आहे. परंतु ही भरती प्रक्रिया शंभर टक्के पार्शदर्शक असावी. कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा खडसेंनी संचालक मंडळाला दिला आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह बरेच संचालक हे अजित पवार गटाचे असताना एकट्या खडसे यांनी या भरती विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मागील वेळी ज्या कंपनीमार्फत भरती झाली (आयबीपीएस एजन्सीमार्फत) तेव्हा २५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती झाली, तरी एकही तक्रार भरती प्रक्रियेविषयी आली नाही. त्याचप्रमाणे आताही परवानगी मिळालेली भरती केवळ गुणवत्तेवर झाली पाहीजे असं खडसेंनी म्हटलं आहे.
जिल्हा सहकारी बँकेची नवी पेठेतील ऐतिहासिक शाखा ‘दगडी बँक’ म्हणून ओळखली जाते, ही दगडी बॅंक विकण्याचा घाट विद्यमान संचालक मंडळाने घातल्याने बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनीही त्यास तीव्र विरोध केला आहे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘दगडी बँक बचाव’ ही मोहीम तीव्र स्वरूपात हाती घ्यावी लागेल, असा इशाराही खडसे यांनी दिला.
दगडी बँक ही केवळ इमारत नसून, ती बँकेची ओळख आणि वारसा आहे. बँकेला सध्या ही मालमत्ता विकण्याची कोणतीही आर्थिक निकड नाही. ‘एनपीए’ कमी करायचा असेल, तर धरणगाव तालुक्यातील बेकायदेशीर केळी लागवड न करता कर्ज तातडीने वसूल करण्यावर चेअरमन यांनी लक्ष केंद्रीत करावे असे खडसेंनी म्हटले आहे.
दगडी बँक विक्री व नोकर भरतीच्या मुद्यावरुन खडसेंनी संचालक मंडळाला चांगलेच घेरले आहे. अध्यक्ष संजय पवार यांच्यासह बरेच संचालक हे अजित पवार गटाचे असतानाही खडसे एकटे मैदानात उतरले आहेत. दरम्यान अध्यक्ष वगळता एकाही संचालकाने अद्याप खडसेंना यावर प्रत्युत्तर दिलेले नाही.
जिल्हा बँकचे चेअरमन संजय पवार यांनी जिल्हा बँकत पत्रकारांशी बोलताना नाथाभाऊ संचालक असताना मधुकर सहकारी साखर कारखाना, जे. टी. महाजन सहकारी सूतगिरणी, रावेर सहकारी साखर कारखाना, बेलगंगा सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकने विक्रीस काढले. या संस्थांशी शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या नव्हत्या का, असा प्रश्न खडसेंना केला.