
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता, कदम यांच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात वातावरण चांगलंच तापलं आहे.
आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते, त्यानंतर आज पुन्हा एकदा कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनिल परब यांनी कदम यांच्यावर डान्सबारवरून आरोप केले होते, त्या आरोपांना उत्तर देताना कदम यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
तो डान्सबार नव्हता. फक्त ऑर्केस्ट्रा होता, त्याचं परमिशन होतं. फक्त कदम कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी डान्सबार डान्सबार म्हणून बदनाम करण्यात आलं. मी कोर्टात जात आहे. हे हॉटेल ३० वर्षापासूनचं आहे. एक तरुणी विक्षिप्त हावभाव करत होती. म्हणून मी त्या शेट्टीला काढलं. परवाना रद्द केला. दीड महिन्यानंतर अनिल परब बोलले. झोपेतून जागे झाले. मुलींचा पैसे खाणारा मी नाहीये.
विलेपार्ले येथील एसआरएची योजना सुरू आहे. ती अजून पूर्ण झाली नाही. माझ्याकडे प्रतिज्ञापत्र आहे. अनिल परब यांनी 8 हजार मराठी माणसांना दम दिला. घरं खाली करा म्हणून, मी तुम्हाला फ्लॅट देईन सांगितलं. उद्घाटन झालं त्यावेळी अनिल परब व्यासपीठावर होते. या ८ हजार लोकांना फक्त एक वर्षाचं भाडं दिलं. ही मराठी माणसं ९ वर्षापासून मुंबईच्या बाहेर आहेत. हे पैशासाठी बिल्डरांचे पाय चाटतात. संजय कदम आणि अनिल परब यांनी कोट्यवधी रुपये कमावले. आम्ही देशोधडीला लागले. बिल्डरने मर्सिडीज दिल्या. संजय कदमने बाईक वाटल्या. हे माझं म्हणणं नाही. तिथल्या रहिवाश्यांचं अॅफिडेव्हिट आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट आता कदम यांनी केला आहे.