मुक्ताईनगरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य !
जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांच्या प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. भुसावळमधील सभेत बोलताना जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुरूवारी मुक्ताईनगरातील सभेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे वक्तव्य केले.
जिल्ह्यातील १६ नगर परिषदांसह दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यात युती असताना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी भाजप विरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे), अशा लढती रंगल्या आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची जादू पुन्हा एकदा राजकारणात रंगत आणताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारी ही योजना स्थानिक निवडणुकांतही तितक्याच जोमाने चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळमधील आपल्या प्रचारसभेत लाडक्या बहिणींचा उल्लेख करत ही योजना कायम ठेवण्याचे ठोस आश्वासन देत काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींच्या आशिर्वादामुळेच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. या योजनेचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे, असे म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर, मुक्ताईनगरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडकी बहीण योजनेचा पुनरूच्चार करत जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असे वक्तव्य केले. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो तसेच दिलेला शब्द पाळतो. लाडकी बहीण योजना सुरू करताना खूप अडथळे आणले गेले. काही लोक कोर्टात गेले. पण तेव्हा माझ्यासारखा महिलांचा भाऊ मुख्यमंत्री होता, ज्याने सर्व अडथळ्यांवर मात करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. पत्नी आणि आईची काटकसर मी पाहिली आहे. त्यामुळे कोणी माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना आता बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
संत मुक्ताईच्या प्रस्थान सोहळ्यानंतर पुन्हा मुक्ताईनगरात आलो आहे. मुक्ताईनगरच्या विकासाची पालखी शिवसेनेच्या खांद्यावर द्या. बाप आमदार आणि लेक नगराध्यक्ष असल्यावर मुक्ताईनगरच्या विकासाला डबल इंजिन लागेल. इतक्या वर्षात जेवढा विकास व्हायला पाहिजे होतो, तेवढा झाला नाही. मुक्ताईनगर शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २२ कोटींचा निधी दिला. सुमारे पाच हजार कोटींच्या निधीतून इतरही बरीच कामे मार्गी लावली. विकास हाच शिवसेनेचा अजेंडा आहे. ज्यांनी सत्ता दिली त्यांचे प्रश्न सोडविणे आमचे कर्तव्य आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातून विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजना पाटील आदी उपस्थित होते.


