ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
————-
मुंब्रा: मुंब्रा-दिवा जोड रस्त्यावरील खाडी पात्रात होणारा अवैध भराव आणि या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य शैलेश मनोहर पाटील यांनी ही तक्रार दिली असून, संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिलेल्या तक्रार अर्जात दोन गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले असून, मुंब्रा पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या मुंब्रा ते दिवा जोड रस्त्यावरील ‘चुहा ब्रिज’ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या कांदळवनाची (मँग्रोव्हज) कत्तल केली जात आहे. तसेच, नैसर्गिक नाले बुजवून खाडी पात्रात कचऱ्याचा भराव टाकण्याचे बेकायदेशीर काम राजरोसपणे सुरू आहे. हा भराव करणारे संबंधित बिल्डर आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवक शैलेश पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.
याच बरोबर संबंधितांवर राजकीय बदनामीचा आरोपही करण्यात आला आहे. खाडीतील या अवैध भरावाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा कोणताही थेट संबंध नसताना, ‘गणेश नीलकंठ पाटील’ नावाचा इसम त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. या बदनामीप्रकरणी गणेश पाटील याच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवून त्याला अटक करावी, अशी आग्रही मागणी शैलेश पाटील यांनी केली आहे.
या तक्रार अर्जासोबत पुराव्यादाखल फेसबुकवरील बदनामीकारक लेखांच्या प्रती (स्क्रीनशॉट्स) मुंब्रा पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन मुंब्रा पोलीस आता पर्यावरण नष्ट करणाऱ्यांवर आणि बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर काय कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
