
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पोहोचले आहेत. दरम्यान त्यापूर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे तिघे एकत्र होते.
संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली, या कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू हे आज संजय राऊत यांच्या एका कौटुंबीक कार्यक्रमात एकत्र आल्याचं पहायला मिळालं, कार्यक्रम संपल्यानंतर राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत. आज दुसऱ्यांना राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं जोर पकडला.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढत आहे, हे आज पुन्हा एकदा पहायला मिळालं आहे. शासनाने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही अध्यादेश रद्द केल्यानंतर मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला होता, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर हजेरी लावली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्रीवर आले होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थावर’ हजेरी लावली, समोर आलेल्या माहितीनुसार या भेटीत दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली होती.
या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.