
आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षणावरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. अशामध्ये आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी मोठे षडयंत्र सुरू आहे. त्यांना संपवण्याचा डाव काही नेत्यांचा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “अजित पवार यांच्याविरोधात मोठे षडयंत्र सुरू आहे. परळीचे घराणे आधी अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हते. कारण परळीचे अर्धे घराणे संपले होते. पण, पवारांमुळे मुंडेंचे अर्धे घराणे मोठे झाले. ते देखील छगन भुजबळांच्या या षडयंत्रामध्ये सहभागी झाले आहेत. कारण यांना ज्यावेळी कोणी मदतीचा हात देत नव्हते त्यावेळी त्यांनी मदतीचा हात दिला. आता अजित पवारांनी मोठे करून देखील या अलीबाबाने तसेच आणखी दोन ते तीन जणांनी हा प्रयत्न आतून सुरू केला आहे. परळीचेही आतून असे म्हणणे आहे की, आमची देखील तुमच्या सारखी दशा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता हे खरं आहे, याची लोकांमध्ये चर्चा आहे. असा मोठा दावा करत त्यांनी गंभीर आरोप केला आहे.
ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला मोठे केले, त्यांचे कुटुंब तसेच पक्ष उद्धवस्त करून टाकले. जो माणूस देवासमान होता, त्या माणसाला तुरुंगात टाकले. त्यानंतर आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत षडयंत्र रचायला लागले आहेत”, असे म्हणत मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. “एक दिवस देवेंद्र फडणवीस बॅग घेत होते, त्या देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली आता आमची अशी दशा आहे. मग ओबीसींचा एक स्ट्रक्चर उभा करायचे का? मग एवढा मोठा गेम प्लॅन, षडयंत्राचा तयार केला अशी लोकांमध्ये चर्चा आहे. पण, यांना माहिती नाही की छगन भुजबळ तुम्ही आतापर्यंत शरद पवार, शिवसेना प्रमुख, अजित पवार यांच्या डोक्यात झोपेत दगड घातला (म्हणजे पक्ष बदलले). पण आता ते देवेंद्र फडणवीस आहेत, असे ते म्हणाले.