मी सत्तेला हापापलेला नाही. सत्ता येते आणि जाते. मी सत्तेत आहे म्हणून मी काम करू शकलो. माझ्यात धमक आहे म्हणून मी बारामतीत काम करून दाखवले. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ३३ उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भेकराईनगर येथे सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रूपाली चाकणकर, दिगंबर दुर्गाडे, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते.
पुणे दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. मेट्रो सर्वदूर पोहचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईनंतर पुणे मोठे शहर आहे. भैरोबा नाला ते हडपसरच्या पुढे, फोनिक्स मॉल ते वाघोली असा उड्डाणपूल करण्याचे नियोजन सुरू असून हडपसरकरांची जर संमती असेल तर उरुळी कांचनपर्यंत नवीन महानगरपालिका करू. कोणाला पटो अथवा न पटो परंतु भविष्यात महानगरपालिका करावी लागणारच. असेही पवार यांनी सांगितले.
फुरसुंगी उरुळीदेवाची व इतर समाविष्ट गावांच्या टॅक्सबाबत बोलताना पवार म्हणाले की टॅक्स लावण्याचा व बंद करण्याचा सरकारला अधिकार आहे. बंद कालव्याबाबत आचारसंहिता नंतर बघू असेही पवार यांनी सांगितले.
उरुळी देवाची येथील काळभैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी अजितदादा पवार जात असताना ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय होती की त्यावर ते म्हणाले की रस्त्याची अवस्था पाहून मला लाज वाटली. तुम्ही येथे राहता. येथील रस्त्याची अवस्था पाहून तुमच्या सहनशिलतेला सॅल्यूट करतो.


