
भारताला सर्वात मोठा धक्का; देशभरात खळबळ !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला, मात्र ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. त्यानंतर चिडलेल्या ट्रम्प यांनी एच 1बी व्हिसावरील शुल्क अचानक प्रचंड प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला, याचा थेट मोठा फटका हा भारताला बसला आहे.
H 1B व्हिसासाठी नव्या शुल्कानुसार आता तब्बल एक लाख डॉलर म्हणजे 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान टॅरिफ आणि व्हिसानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे आदेश लागू केले आहेत. या नव्या आदेशाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना बसणार आहे. अमेरिकेच्या सरकारने अमेरिकेमधील सर्व महाविद्यालयांना नुकताच एक मेमो दिला आहे. त्यामध्ये सरकारने काही अटी घातल्या आहेत, या अटींची पूर्तता करणाऱ्या महाविद्यालयांनाच सरकारी फंड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामधील सर्वात महत्त्वाची जी अट आहे ती म्हणजे कुठल्याही महाविद्यालयांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ही 15 टक्क्यांपर्यंतच मर्यादीत असावी, त्यापेक्षा ती अधिक असू नये, असं म्हटलं आहे.
एवढंच नाही तर त्या-त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कॉलेजमध्ये कोणत्याही एका देशील पाच टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी असता कामा नये, असं देखील या आदेशात म्हटलं आहे. नव्या आदेशानुसार आता अमेरिकेतील कोणत्याच महाविद्यालयाला कुठल्याही एका देशातील पाच टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाहीये, हेच नियम विद्यापीठांना देखील लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान सरकारच्या या नव्या आदेशामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांचं सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण जगातील इतर देशांपेक्षा भारतीय विद्यार्थ्यांचं अमेरिकेत शिकायला जाण्याचं प्रमाण अधिक आहे. द वॉल स्ट्रीट जर्नच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर मर्यादा घालण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. एकीकडे भारतावर टॅरिफ लावण्यात आला आहे, दुसरीकडे एच 1बी व्हिसामध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे, आता त्याचवेळी ट्रम्प प्रशासनाने हा नवा आदेश काढला आहे, याचा मोठा फटका हा भारताला बसणार आहे.