
महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. या मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत सुमारे 31 लाख शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडूनही अतिरिक्त मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बंद दाराआड बैठक घेतली. जवळपास पाऊण तास चाललेल्या या चर्चेत राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेऊन केंद्राकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
अमित शाह यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहून शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. त्यांनी सांगितलं, ‘महाराष्ट्र सरकारने अहवाल पाठवावा, आम्ही लगेच मदत पाठवतो. हे सरकार शेतकऱ्यांची खरी काळजी घेणारं आहे.’
शाह पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील तिन्ही नेते फडणवीस, शिंदे आणि पवार हे तिघेही शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर आहेत. तिघांनी काल माझ्यासोबत बसून शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली.’ ते म्हणाले, ‘आपल्या एनडीए सरकारमधील सर्व आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक महिन्याचं वेतन देऊन मदत केली आहे.’
राज्यात 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालं असून, राज्य सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला ₹10,000 रुपयांची आर्थिक मदत आणि 35 किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ई-केवायसी संदर्भातही शिथीलता देण्यात आली आहे, जेणेकरून मदत तातडीने पोहोचू शकेल.
अमित शाह यांनी भाषणादरम्यान विरोधकांवर निशाणा साधत म्हटलं, ‘मी आज इथे आलो, मला आनंद झाला. पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या नावाने हा जिल्हा जोडला गेलेला आहे. औरंगाबाद शहराचे नाव आम्ही बदलले, हे तेच लोक करू शकतात, जे शिवछत्रपतींचे अनुयायी आहेत, तेच करु शकतात. जे औरंगजेब यांचे विचार पुढे घेऊन जातात, ते करु शकत नाहीत’ , असे म्हणत अमित शाहांनी नाव न घेता विरोधकांवर हल्लाबोल केला
मराठवाड्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की, केंद्र सरकार लवकरच राज्याला मदत पाठवणार आहे.