
शिंदे की अजितदादा; शेवटी ठरलं…
दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येते. आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होते.
यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. मात्र कार्तिक एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान हा उपमुख्यमंत्र्यांचा असतो. दरवर्षी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होते.
परंतु सध्या राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, त्यामुळे यंदा विठ्ठल रुक्मिणी यांच्या महापूजेचा मान कोणाला मिळणार? एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा होणार की अजित पवार यांच्या हस्ते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता ही उत्सुकता संपलेली आहे. यंदा हा मान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.
कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठालाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागितलं होतं. त्यानुसार आता शासकीय महापूजेचा मान हा एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. विधी व न्याय विभागानं केलेल्या मार्गदर्शनानुसार यंदा कार्तिकी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे हे विठ्ठलाची महापूजा करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.
वर्षातून दोनदा होते शासकीय महापूजा
दरवर्षी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोनदा शासकीय महापूजा होते. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात येते. त्यापैकी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. तर कार्तिक एकादशीला हा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. यंदा आषाढी एकादशी निमित्त देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची महापूजा केली, मात्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे यंदा कार्तिक एकादशीच्या पुजेचा मान कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर याता एकनाथ शिंदे यांना हा मान मिळाला आहे, ते या कार्तिक एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापुजा करणार आहेत.