
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. समोर होते सरन्यायाधीश भूषण गवई. अचानक गोंधळ झाला.. एका व्यक्तीनं भारताच्या सरन्यायाधीशांच्या दिशेनं काहीतरी फेकण्याचा प्रयत्न केला.
गोंधळ उडाला, सुरक्षा रक्षकांनी संबंधित व्यक्तीला पकडलं आणि बाहेर नेलं. यावेळी सरन्यायाधीश मात्र शांत होते, नंतर ते काय बोलले आणि नेमकं काय घडलं हेच सविस्तर जाणून घेऊया.
नेमकं घडलं तरी काय?
सोमवारी (6 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात ही धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने डेस्कवर जाऊन त्याचा बूट काढला आणि चक्क सरन्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला बाहेर काढले. तो निघून जाताना थेट म्हणाला की, “सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” अशा घोषणा देत होता. आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर असल्याचे सांगितले जात आहे. 2011 साली त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणी झाल्याचीही माहिती आहे.
काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्याने सरन्यायाधीशांकडे चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे, तो व्यक्ती वकिलाच्या काळा कोट परिधान करून आला होता.
त्या घटनेनंतर सरन्यायाधीश काय म्हणाले?
या अनपेक्षित घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी पूर्ण शांतता आणि संयम राखला. त्यांनी कोणताही गोंधळ न करता पुढील वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आणि उपस्थितांना या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आम्हाला काहीही फरक पडत नाही. या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, असं शांतपणे सांगितलं.
दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्यात आली आहे आणि न्यायालयाच्या आवारात सुरक्षा वाढवण्यात आली असल्याची देखील माहिती आहे.
हा हल्ला करण्याचा प्रयत्न का केला यावरुन आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनी खजुराहो येथील एका पुरातन मंदिरातील भगवान विष्णुच्या सात फूट उंच मुर्तीच्या पुनर्स्थापनेबाबत टिप्पणी केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. ही याचिका फेटाळताना ते म्हणाले होते की, ‘जा आणि देवालाच काहीतरी करण्यासाठी सांगा. तुम्ही भगवान विष्णुचे कट्टर भक्त असल्याचे सांगता. मग आता जा आणि प्रार्थना करा’, असं CJI गवई म्हणाले होते.
त्यामुळं या विधानाचा राग धरुन या आरोपीनं हल्ल्याचा प्रयत्न केला असेल का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान चौकशीनंतर याबाबत सविस्तर माहिती समोर येईलच, मात्र या घटनेनं सुप्रीम कोर्टात काही काळ चांगलाच गोंधळ झाला.