
मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले…
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यता जोर धरत असतानाच राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार की, उद्धव ठाकरे बंधूप्रेमासाठी आघाडीतून बाहेर पडणार, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या.
परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत नकार असल्याचे म्हटले आहे. यावर आता मनसेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. इंडिया आघाडीच्या वाटाघाटी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर होणार आहेत. जिल्हा आणि ब्लॉक त्याशिवाय तिथले जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष युतीबाबत निर्णय घेणार आहेत. त्यांच्या निर्णयावर आम्ही सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत. त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
परवानगी मागायला काँग्रेस पक्षाकडे कोण गेले होते?
मुळात मनसेला महाविकास आघाडीत घ्या, अशी परवानगी मागायला काँग्रेस पक्षाकडे कोण गेले होते? आमच्याकडून त्यांच्याकडे कोणीही गेले नव्हते. हर्षवर्धन सपकाळ नेमके कशासंदर्भात बोलले आहेत, हे माहिती नाही. आमच्या पक्षाचा अंतिम निर्णय हा राज ठाकरे हेच घेतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी या कौटुंबिक स्वरुपाच्या आहेत. राजकीय स्वरुपाच्या कोणत्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत. किमान आम्हाला तरी तशी कोणतीही माहिती नाही. उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीबाबत केलेल्या वक्तव्यांचा आम्हाला आदर आहे. पण राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल, असे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कुणी काहीही म्हटले तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद, व्यक्तिगत आणि राजकीय नाते अतिशय घट्ट झाले आहे. अगदी स्पष्ट सांगायचे झाले तर, कुणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी चर्चा फार दूरपर्यंत गेली आहे. आता माघारीचे दोर नाहीत. प्रकरण फार पुढे गेलंय. त्यामुळे कुणी कुठल्या मेळाव्यात काहीही वक्तव्य केले, हे दोन भाऊ कसे एकत्र येतात ते पाहू. मात्र तुमच्या छाताडावर पाय रोवून हे दोन्ही ठाकरे बंधू उभे राहण्याच्या मनस्थितीत आहेत, असे खासदार संजय राऊत म्हणालेत.