
प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक फेकणारी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट हल्ला करणाऱ्यांची प्रवृत्ती एकच आहे. संस्कृतीहीन विचारसरणी झाल्याचे हे घोतक आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी आज येथे केली.
अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी ते अकोला येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधकांवर टीका करण्यासह आगामी निवडणुकीत मनसे सोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या संविधानात पक्षबदल संदर्भात तरतुदी आहेत. कुठल्याही लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे पक्ष बदलता येत नाही. दळभद्री निवडणूक आयोगाने मात्र नियमबाह्य पद्धतीने चिन्ह व पक्षाचे नावही देऊन टाकले. ते करण्यापूर्वी आमच्याकडे सदस्य संख्यांची विचारणी केली. ती सादर केली. सर्वांची हमीपत्रे दिली. तरी सुद्धा नाव व चिन्हे दिले. संविधानातील तरतुदीचा भंग सर्वप्रथम निवडूक आयोगाने केला आहे, असा आरोप खा. अरविंद सावंत यांनी केला.
न्यायव्यवस्था तर धन्यच आहे. शिवसैनिक अतिशय भावनिक झाले होते. पक्ष आणि चिन्ह या विषयावर सुनावणी ही माजी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या कार्यकाळातच होणे अपेक्षित होते. त्या अडीच वर्षांच्या काळातच निष्पक्षपणे निर्णय झाला असता तर चित्र वेगळे असते. राज्यपालांनी जे केले ते संविधानाचा घात करणारे होते. असे चंद्रचूड म्हणाले होते. ते घटनात्मक नव्हते तर त्याला मान्यता कशी दिली? असा प्रश्न अरविंद सावंत यांनी केला.
चंद्रचूड यांच्या सर्वोच्च न्यायालयातील कार्यकाळावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. न्यायालयीन व्यवस्थेत सुद्धा न्याय मिळत नाही. आता होणाऱ्या सुनावणीत तरी आम्हाला न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा खा.अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विधानसभानिहाय तयारीचा आढावा घेतला. यावेळी बाळापूरचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी निवडणुकीत नेमकी काय परिस्थिती राहू शकते याची माहिती घेतली. कुठल्या जागेवर पक्ष भक्कम आहे व कोणती जागा कमकुवत ठरू शकते, हे देखील त्यांनी जाणून घेतले. निवडणुकीच्या तयारीला लागून पक्ष मजबूत करण्याच्या सूचना खा. सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.