
राकेश किशोर यांनी सांगितलं कारण; मांडले ७ मुद्दे…
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी ७१ वर्षीय वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला.
राकेश किशोर असे या वकिलाचे नाव असून, या घटनेनंतर देशभरातून याचा निषेध केला जात आहे. दरम्यान हे वकील राकेश शर्मा यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. यावेळी घडलेल्या घटनेचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे किशोर म्हणाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राकेश किशोर यांनी त्यांची या घटनेमागील त्यांची संपूर्ण भूमिका आणि कारणे स्पष्ट केली आहेत.
१) मी खूप दुखावला गेलो होतो..
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना बूट फेकून का मारण्याचा प्रयत्न केला, याबद्दल राकेश किशोर म्हणाले की मी खूप दुखावला गेलो की, १६ सप्टेंबर सरन्यायाधीशांच्या कोर्टात एका व्यक्तीने पीआयएल दाखल केली आणि गवईंनी त्याची पूर्णपणे थट्टा केली, म्हणजे ते म्हणाले की, तुम्ही जाऊन मूर्तीला प्रार्थना करा. देवाच्या मूर्तीला म्हणा की त्यांनी आपलं डोकं स्वत:च आधीच्या स्थितीत आणावे. आपण पाहतो की हेच सरन्यायाधीश अनेक धर्मांच्या विरोधात, जे दुसर्या समुदायाचे लोक आहेत- आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे लोक कोण आहेत, त्यांच्या विरोधात प्रकरण येते तेव्हा मोठे निर्णय घेतात… मी उदाहरण देतो की, हल्दवानी येथे रेल्वेच्या जमिनीवर एका विशिष्ट समाजाचा ताबा आहे, जेव्हा तो हटवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्टे आणला आणि तो आजपर्यंत लावलेला आहे, असे राकेश किशोर म्हणाले.
२) सनातन धर्मासंबंधी निर्णय..
राकेश किशोर पुढे बोलताना म्हणाले की, नुपूर शर्माचे जेव्हा प्रकरण आलं, तेव्हा कोर्टाने म्हटले की, तुम्ही वातावरण खराब केलं. हे सर्व बोलतात, त्यावर निर्बंध लावतात हे सर्व ठीक आहे. पण जेव्हा सनातन धर्माशी संबंधित एखादे प्रकरण येते, मग ते जलिकट्टू असेल किंवा दहीहंडीची उंची निश्चित करायची असेल किंवा इतर कोणताही लहान-मोठा मुद्दा असेल तर त्यावर सर्वोच्च न्यायालय असे आदेश देत आले आहे, ज्यामुळे मी खूप दु:खी आहे. त्यांनी असे केले नाही पाहिजे. ठीक आहे, त्या व्यक्तीला दिलासा द्यायचा नसेल तर नका देऊ, पण मग त्याची थट्टाही करू नका. त्याला म्हणाले की, त्या मंदिरातील मूर्तीसमोर ध्यान करा. अन्याय हा आहे की ती याचिका देखील फेटाळून लावली. या सर्व गोष्टीं मुळे मी खूप दु:खी होतो, असे ते म्हणाले.
३) मी कमी शिकलेला व्यक्ती नाही
तसे तर मी हिंसेच्या खूप विरोधात आहे. पण तुम्ही हे देखील पाहा की, एक अहिंसक व्यक्ती ज्यावर आजवर कोणताही गुन्हा नाही, जो कोणत्याही गटाचा भाग नाही, त्याला हे सर्व का करावे लागेल ही नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे. मी देखील कमी शिकलेला व्यक्ती नाही. मी देखील एमएससी, पीएच.डी, एलएलबी, गोल्ड मेडलिस्ट आहे. असंही नाही की मी नशेत होतो किंवा कसल्यातरी गोळ्या खाल्ल्या होत्या, असं काही नाही. त्यांनी अॅक्शन केली, माझी रिअॅक्शन होती. तुम्ही हे हवं तसं घेऊ शकता. मी कोणत्या भीतीखाली नाही, ना जे झालं त्याचा मला पश्चाताप आहे, असेही राकेश किशोर म्हणाले.
४) मी विचार करून गेलो होतो
तुमची कोर्टात सुनावणी होती की तु्म्ही विचार करून गेला होतात, याबद्दल किशोर म्हणाले की, मी आधीच विचार करून यासाठी गेलो होतो की, १६ सप्टेंबरनंतर मला झोप येत नव्हती आणि कोणतीतरी दैवी शक्ती मला झोपेतून जाग करत म्हणत होती की हे तू काय करत आहेस, झोपला आहेस? देश जळत आहे आणि तू झोपला आहेस, त्यामुळे हे मला करावे लागले. माझे अपोलोमध्ये मागच्या ७-८ वर्षांपासून हृदयाचे उपचार सुरू आहेत, मी दोन दिवसांची औषधे घेऊन गेलो होतो, कारण मला माहिती होतं की पोलीसांच्या प्रकरणात वेळ लागेल. मवा आश्चर्य वाटत आहे की सरन्यायाधीशांनी मला सोडून दिलं.
५) सरन्यायाधीशांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे
बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुढे काय झालं याबद्दल सांगताना राकेश किशोर म्हणाले की, तेथे डिसीपी आणि एसीपींच्या कार्यालयात माझी तीन-चार तास चौकशी केली गेली. कोण अधिकारी होते मला माहिती नाही. पण त्यांचे खूप आभार की त्यांनी मला एकदा चहा-बिस्किट खाऊ घातले, लंच देखील दिला. हे सर्व मी त्यांचे उपकार मानतो.
काय करावे काय करू नये यामध्ये मी पडणार नाही. सीजेआयंनी देखील हा विचार केला पाहिजे की ते एवढ्या उच्च घटनात्मक पदावर बसले आहेत, तेव्हा त्यांनी मिलॉर्ड (Milord) चा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे. तुम्ही एखाद्याला भीक देऊ शकत नसाल तर किमान त्याचे भांडे तरी फोडू नका. त्याचा इतका अपमान तरी करू नका.
त्याच्या पुढे तुम्ही मॉरिशससारख्या देशात जाता आणि म्हणता की देश बुलडोझरने चालणार नाही. माझा सीजेआय यांच्याशी आणि माझा विरोध करणाऱ्यांना प्रश्न आहे की, ज्या लोकांच्या विरोधात बुलडोझर चालवले जात आहे त्यांनी सरकारच्या संपत्तीवर कब्जा केले आहेत, मोठं-मोठे महल, हॉटेल बांधले आहेत. त्यांच्याविरोधात योगीजी (योदी आदित्यनाथ) जे बुलडोझर चालवत आहेत ती कारवाई चुकीची आहे? या सर्व गोष्टींमुळे मी दुखावला गेलो आहे आणि राहीन, असेही राकेश किशोर म्हणाले आहेत.
६) सरन्यायाधीश दलित नाहीत
दलिस सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. याबद्दल विचारले असता किशोर म्हणाले की, माझं नाव आहे डॉ. राकेश किशोर, कोणी माझी जात सांगू शकतं? मी दलित असू शकतो. ही तर एकतर्फा गोष्ट होईल की तुम्ही या गोष्टीचा फायदा उचलत आहात की ते दलित आहेत… तर ते दलित नाहीत. ते सर्वात आधी सनातनी होते, हिंदू होते. ते हिंदू दलित होते आणि त्यानंतर त्यांनी सर्व सोडून बौद्ध धर्म स्वीकारला, हेही मला माहिती आहे. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जर त्यांना हिंदू धर्मातून बाहेर पडलो असे वाटत असेल तर मग आता ते दलित कुठे राहिले? ही मानसिकतेची गोष्ट आहे. आणि जे दलित म्हणत आहेत, हे तर लोक हे सरकार पाडून, देश पुन्हा गुलाम व्हावा असे इच्छित आहेत, हे तर त्यांचे राजकारण आहे.
७) माफी मागणार नाही
काल झालेल्या या संपूर्ण घटनेबद्दल पश्चाताप आहे का? या प्रश्नावर किशोर म्हणाले की, मला कसलाही पश्चाताप नाही आणि मी माफीही मागणार नाही. मी काहीच केलं नाही. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करत आहात. परमात्माने जे करवून घेतले ते मी केले. मी करत नाही, फक्त एक साक्षीदार आहे. त्याने करवून घेतले, त्याची इच्छा पूर्ण व्हावी, त्याची इच्छा असेल की मला जेलमध्ये जावे किंवा फाशी दिली जावी तर ती परमात्म्याची इच्छा आहे आणि तू पूर्ण व्हावी. मी ७२ वर्षांचा झालो आहे आणि कधीपर्यंत अशा घटना सहन करेल.