
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण हे चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्यात होणार्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला शिवसेना पक्ष, नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने जुलैमध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती.
याप्रकरणी आज (08 ऑक्टोबर) सुनावणी अपेक्षित होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारीख दिली आहे. याप्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी सुनावणीची माहिती दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना असीम सरोदे म्हणाले की, न्यायाधीशांनी मागच्या तारखेला सांगितलं होतं की, सुनावणीवेळी कोणतेही छोटे छोटे मुद्दे न घेता आपण अंतिम तारीख नक्की करू, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आजची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटत होतं की, आज निकाल लागेल. पण न्यायाधीशांना आज त्यांच्या अर्धवट झालेल्या सुनावण्या पूर्ण करायच्या असल्याने त्यांनी सांगितलं की, आज सुनावणी शक्य होणार नाही. तसेच आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी तीन दिवस पाहिजेत, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आज सुनावणी पूर्ण होणार नाही, हे लक्षात घेऊन न्यायाधीशांनी पुढची तारीख दिली आहे. तसेच सुनावणी एक-दोन दिवसात संपवू असेही त्यांनी सांगितले आहे.
तुमच्याकडून 45 मिनिटात युक्तीवाद संपणार आहे, असं न्यायालयात सांगण्यात आलं आहे, असा प्रश्न विचारला असता, असीम सरोदे म्हणाले की, कपील सिब्बल यांनी स्वत: सांगितलं आहे की, आम्हाला युक्तीवाद करण्यासाठी फक्त 45 मिनिटं पाहिजे आहेत. त्यानंतर शिंदे गटाकडून जो काही युक्तीवाद करायचा आहे, तो त्यांना करू द्या, अशी माहिती सरोदे यांनी दिली.
डिसेंबरमध्ये सुनावणी घ्यावी, असा आग्रह शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. याबाबत बोलताना असीम सरोदे म्हणाले की, ज्यांची बाजू कमजोर असते, त्यांना काहीतरी न्यायिक क्लुप्त्या करायच्या असतात. मी मगाशी जसं म्हटलं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संविधानिक आणि कायद्याच्या दृष्टीकोनातून मजबूत बाजू आहे. त्यामुळे हे प्रकरण जेवढं पुढे ढकलता येईल, तेवढं ढकलावा, अशा सूचना त्यांना मिळाल्या असतील, त्यानुसार, त्यांच्या वकिलांकडून युक्तीवाद केला असण्याची शक्यता आहे, असेही सरोदे म्हणाले.