
एका सहीने केली अडचण; प्रकरण अंगाशी येणार ?
कोकणात शिवसेना आमदार तथा राज्यमंत्री योगेश कदम यांचा पाय पुन्हा खोलात गेला आहे. यापूर्वी वाळू प्रकरणात आणि सावली डान्सबार प्रकरणात ते चांगलेच अडचणीत आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी योगेश कदमांचा राजीनामाच मागितला होता. आताही योगेश कदम एका सहीने मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणावरून पुणे पोलिसांचे अक्षरशः नाक कापले गेले आहे. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निलेश घायवळचा सख्खा भाऊ आणि कुख्यात गुंड सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला आहे. या परवान्यास पोलिसांचा विरोध असूनही कदमांनी शस्त्र परवाना दिला आहे. तर त्यांनी तो कोणत्या आधारे परवाना दिला? असा सवाल आता विचारला जात आहे.
याआधी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अवैध वाळूचा उपसा होणाऱ्या गाड्या अडवणे, त्यांचा दंड वसूल करण्यासह जप्त केलेल्या वाळूत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यांच्यामुळे राज्याची आणि सरकारची प्रतिमा डागाळली जात आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या प्रकरणामुळे सभागृहात जोरदार खडाजंगी झाली होती.
वाळूचा मुद्दा शांत होत नाही तोच मुंबई पोलिसांनी केलेल्या सावली बार कारवाईवरून योगेश कदम आणि रामदास कदम अडचणीत आले होते. त्यावेळी अनिल परब यांनी विधीमंडळ हादरवून सोडत केलेल्या आरोपामुळे पुन्हा वातावरण तापले होते. परब यांनी सावली डान्सबार हा गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावाने असल्याचा दावा विधान परिषदेत केला होता. तसेच या बारमध्ये महिला नाचवल्या जातात असल्याचा आरोप करताना महसूल राज्यमंत्र्यांच्या घरातच डान्सबार असेल तर काय करायचे? असा सवाल उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांनी गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणी कारवाई करावी, तशी कारवाई झाली नाही तर सरकारचा या कृतीला पाठिंबा असल्याचे सिद्ध होईल. गृह राज्यमंत्र्यांकडूनच कायदा पायदळी तुडवला जात असेल तर हे मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलं असा परब यांनी हल्लाबोल केला होता. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांना विधानपरिषदेत निवेदन सादर करावे लागले होते. त्यावेळी फडणवीस यांनी परब यांनी सर्व पुरावे आणून द्यावेत, मी चौकशी करतो, असे म्हटले होते.
त्यानंतर परब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन कदम यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे दिले होते. ही दोन प्रकरणे अद्याप शांत झालेली नसतानाच आता पुन्हा एकदा योगेश कदम यांचे गंभीर प्रकरणात नाव समोर आले आहे. तर हे प्रकरण परब यांच्यासह विरोधकांसाठी आयत कोलितच ठरणार असल्याचीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.