
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे बिगुल फुंकले असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी काल राज्य शासनाने ४७१.०५ कोटीचा निधी देण्यास मंजूरी दिली आहे.
त्यातच आता दिपावली सणासाठी आता सण उत्सव अग्रीम उचल देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने आपल्या विविध देण्यांसाठी येत्या १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.त्यातच काल राज्य सरकारच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबरचा पगार वेळेत व्हावा यासाठी ४७१.०५ कोटीचा निधी देण्यास गृहविभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे सप्टेंबरचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण तोंडावर आल्याने ऊत्सव अग्रीम उचल मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
या वर्षाचा दिपावली हा सण दि.२१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची रु. १२,५००/- उत्सव अग्रीम घेण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचे विभाग नियंत्रकांकडे अर्ज जमा करावेत. त्या अर्जाची तपासणी करुन पात्र कर्मचाऱ्यांची यादी १५ ऑक्टोबर २०२५ पर्यन्त या कार्यालयास पाठवावी असे आदेश देण्यात आले आहेत.
वेतन मर्यादा काय ?
उत्सव अग्रीम मिळण्यासाठी कमाल मूळ वेतन मर्यादा रु.४३४७७/- इतकी ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. ४३४७७/- पेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम मिळणार नाही असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवत्ती अग्रीम वाटपापासून १० महिन्यांच्या आत असेल अशा कर्मचाऱ्यांनी उत्सव अग्रीम अर्जाचा विचार करु नये असेही या पत्रकात म्हटले आहे. अग्रीम वाटपाकरीता आपल्या घटकास किती रक्कम लागणार आहे याची माहिती दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विभागिय लेखा अधिकारी राज्य परिवहनाला कळवावी असे या पत्रकात म्हटले आहे.
विभागिय कार्यालयातील इच्छुक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज हे संबंधित शाखा प्रमुख यांच्या मार्फतच पाठवावेत. स्वतंत्रपणे अर्ज सादर करु नयेत, ते स्वीकारले जाणार नाहीत असेही पत्रकात म्हटले आहे.