
पक्षश्रेष्ठी कितपत दखल घेणार ?
भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा अहिल्यानगर दौरा कोणी गाजवला असेल, तर तो विवेक कोल्हे यांनी, तशी चर्चा आहे! अमित शहा यांचे दोन ठिकाणी कार्यक्रम झाले.
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात पहिला, आणि कोपरगावमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखाना इथं दुसरा कार्यक्रम झाला.
या दोन्ही कार्यक्रमातील शक्तिप्रदर्शनाची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. पण चर्चेचा सूर हा विवेक कोल्हे यांनी कार्यक्रमातून केलेल्या शक्तिप्रदर्शनाकडे झुकता आहे. विवेक कोल्हे यांच्या या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं, त्यांना बळ मिळाल्यास, अहिल्यानगरमध्ये भविष्यातील राजकीय गणितं बदलू शकतात, असा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत.
विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)परिवाराचा अहिल्यानगरच्या राजकारणात दबदबा राहिलेला आहे. तो आजही दिसतो. विखे पाटील परिवारातील प्रत्येक सदस्य, अहिल्यानगर हे आमचं कुटुंब आहे, आवर्जून सांगतो. विखे पाटील परिवाराची चौथी पिढी अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. विखे परिवारबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारण थोरातांचा प्रभाव दिसतो. या दोन कुटुंबांशिवाय अहिल्यानगरचं राजकारणाचा परिघ पूर्ण होत नाही, असे आतापर्यंतचं गणित!
गेल्या पंधरा वर्षात राज्यातील राजकीय गणितं खूप बदलली आहे. 2019च्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रयोगानंतर, तर राजकाराचा पोतच उजव्या दिशाला गेला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा (Congress) हात सोडून, भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर विखे पाटील-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच वाढला. विखे पाटलांची विकास आघाड्याचं राजकारण अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. त्याचा प्रभाव आजही दिसतो, आणि तो अलीकडच्या काळात वाढलेला दिसतो, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विखे पाटील भाजपमध्ये चांगलेच स्थिरावलेत, पण भाजपमधील निष्ठावान कार्यकर्ते दूर दिसत आहेत.
विखे पाटलांच्या राजकीय वर्चस्वाला किंवा असं म्हणता येईल की, विकास आघाड्याच्या राजकारणाला शह देण्यासाठी विखे पाटील विरोधक नेहमीच एकत्र आलेले दिसतात. सहाजिक या विरोधकांना राज्यातून शरद पवारांचं छुपं बळ मिळतं असते, अशी तक्रार होते. आणि ते दिसतं देखील! कोपरगावच्या कोल्हेंबाबतीत देखील तसंच काहीसं दिसतं आहे. पण राजकीय परिस्थितीचा फायदा कसा उचलायचा, याचं गणित कोल्हेंना भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुळवून दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघात महायुतीतून भाजपने एक पाऊल मागं घेतलं. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांना थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर होते. स्वतः कोपरगावात तळ ठोकून होते. फडणवीस यांच्या शब्द पडू न देता कोल्हेंनी, त्यांना मोठेपणा दिला आणि निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर फडणवीस यांनी त्याचवेळी पुढचं राजकीय जुळवलं अन् कोल्हे मायलेकाला थेट पक्षाचे केंद्रीय नेतृत्व अमित शहा यांच्यासमोर उभं केलं.
एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला भिडले
अमित शहा यांच्या या भेटीनंतर विवेक कोल्हे यांना राजकारणात नवसंजीवनी मिळणार, याची अधिकच खात्री झाली. यानंतर नाशिक शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हेंनी अपक्ष म्हणून नशिब आजमावलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नाशिक शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार किशोर दराडे यांना राजकीय मैदानात भिडताना, त्यांनी चांगली चुणूक दाखवली. त्यामुळे दराडेंच्या विजयापेक्षा विवेक कोल्हेंची राज्यभर चर्चा झाली.
विखे अन् कोल्हे संघर्ष
तत्पूर्वी विखे पाटील अन् कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्षाला गणेश सहकारी साखर कारखान्यामुळे टोकावर नेलं. हा संघर्ष लोकसभा निवडणुकीत देखील दिसला. साईसंस्थानच्या कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत देखील दिसला. विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील हे राजकीय द्वंद अनुभवायला मिळाले. पण कोल्हे यांनी राजकारणात संयम राखला. अमित शहा अन् देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यानं संपर्कात राहिले. पण याची चर्चा अधिक न करता, कृतीवर भर देत अमित शहा यांना कोपरगावात आणलं.
विवेक कोल्हेंची शक्तिप्रदर्शनासाठी धडपड
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीएनजी) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प सुरू केला अन् त्याचं उद्घाटन देशाचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते केलं. या कार्यक्रमात विवेक कोल्हेंनी यांनी नियोजनपूर्वक शक्तिप्रदर्शन केलं. हे शक्तिप्रदर्शन पक्ष नेतृत्वाच्या नजरेपासून सुटलं नाही. विवेक कोल्हे यांची ही धडपड कशासाठी? हे पक्ष नेतृत्वानं ओळखली.
विश्वास ठेवा, पण मुहूर्त नाही!
भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि प्रतिस्पर्धी आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यंत्री अजित पवार यांनी विवेक कोल्हेंची धडपडीला जाहीरपणे व्यक्त केली. राजकीय पुनर्वसन होणार असल्याचे संकेत दिले. ‘विश्वास ठेवा, ‘श्रद्धा आणि सबुरी ठेवा’, असा अप्रत्यक्ष सल्ला दिला. असे सांगताना, विवेक कोल्हेंना मुहूर्त सांगितला नाही. त्यामुळे विवेक कोल्हे यांचं राजकीय पुनर्वसन कधी? हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत आहे.
राज्यातील इतरांच्या राजकीय पुनर्वसनाचं काय?
विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा असताना, फक्त त्यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली एवढाच निकष आहे का? असे प्रश्न देखील उपस्थित केले जाऊ लागले आहे. मतदारसंघात त्यांचे राजकीय प्रभाव वाढत आहे. पण, तो मतातून भाजप नेतृत्वासमोर सिद्ध झालेला नाही. राज्यात अनेक ठिकाणी भाजपकडून इच्छुक असलेल्यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे. विवेक कोल्हे जशी राजकीय पुनर्वसनाची इच्छा बाळगून आहेत, तसे इतर देखील आहेत, याची देखील चर्चा होत आहे. म्हणजेच विवेक कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन भाजप नेतृत्वासाठी चॅलेंज ठरणार असल्याचे चित्र आहे.
केंद्रात की राज्यात?
विवेक कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन करायचे ठरवल्यास, ते नक्की कुठं होणार आहे याची देखील चर्चा आहे. केंद्रात की, राज्यात, अशी चर्चा आहे. विवेक कोल्हेंकडून अजून तरी, तशी इच्छा जाहीररित्या समोर आलेली नाही. परंतु केंद्रात काम करण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांचे निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. पण पक्ष नेतृत्वाने निर्णय घ्यायचे ठरवल्यास, तो कोणता घेतात, त्याला मुहूर्त कधी, याची मात्र उत्सुकता आहे. तोपर्यंत तरी विवेक कोल्हेंना वाट पाहावी लागणार आहे.