
राज्य सरकार सर्व नोंदणीकृत वैद्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करेल, जेणेकरून कागदपत्रांच्या अभावात त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये असं मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री साय हे राजधानी रायपूर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय ऑडिटोरियममध्ये छत्तीसगड आदिवासी स्थानिक आरोग्य परंपरा व औषधी पादप मंडळ आयोजित राज्यस्तरीय पारंपरिक वैद्य संमेलनात सहभागी झाले होते. तिथे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संमेलनात मुख्यमंत्र्यांचे स्वागत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या वैद्यांनी पारंपरिक जडीबुटींच्या माळा घालून केले. मुख्यमंत्री यांनी या प्रसंगी औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनीचेही उद्घाटन केले. मुख्यमंत्री साय यांनी पद्मश्री हेमचंद मांझी यांचा उल्लेख करताना सांगितले की, दुर्गम भागात राहूनही मांझी गंभीर आजारांचे उपचार आपल्या पारंपरिक ज्ञानाने करतात. अमेरिकेतूनही लोक त्यांच्या कडे उपचारासाठी येतात ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वैद्य परंपरा ही आपल्या देशाची प्राचीन आणि समृद्ध वैद्यकीय पद्धती आहे. भारतात सुमारे ६० ते ७० हजार वैद्य आहेत, ज्यांपैकी सुमारे १५०० वैद्य छत्तीसगडमध्ये सक्रिय आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच आपल्या पारंपरिक वैद्यक प्रणालीला जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिली आहे. छत्तीसगडने संपूर्ण देशात ‘हर्बल स्टेट’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. फक्त छत्तीसगडमध्ये दीड हजारांहून अधिक औषधी वनस्पती आढळतात. दुर्ग जिल्ह्यातील पाटन येथील जामगावमध्ये औषधी वनस्पतींपासून अर्क काढण्यासाठी एक कारखाना स्थापन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नैसर्गिक वैद्यकाला प्रोत्साहन देत आहेत. या दिशेने कामांना गती देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे असं मुख्यमंत्री साय यांनी म्हटलं.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये उच्च दर्जाच्या जरीबुटी उपलब्ध आहेत. राज्य सरकार क्लस्टर आधारित मॉडेल विकसित करत आहे, जेणेकरून स्थानिकतेच्या आधारावर उपलब्ध जरीबुटीचा अधिकतम वापर करता येईल. सरकारचे उद्दिष्ट स्थानिक वैद्यांना रोजगाराशी जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. त्याचबरोबर औषधी वनस्पती आणि वृक्षांच्या संवर्धनाच्या दिशेनेही ठोस प्रयत्न केले जात आहेत असं मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले.
मानवी आरोग्यासाठी नव्हे तर पशू आरोग्यासाठीही फायदेशीर
वैद्यांना समाजात अत्यंत महत्त्वाचा स्थान आहे. पद्मश्री हेमचंद मांझी हे रामायण काळातील सुषेन वैद्यांसारखे आहेत. ज्या प्रकारे सुषेन वैद्यांनी लक्ष्मणाला दुर्लभ उपचार केला होता, त्याच प्रकारे छत्तीसगडमध्ये मांझी दुर्लभ ते अतिदुर्लभ रोगांचे यशस्वी उपचार करत आहेत. पारंपरिक वैद्यांचे योगदान केवळ मानवी आरोग्यासाठीच नव्हे तर पशू आरोग्याच्या क्षेत्रातही अमूल्य आहे असं कृषी व किसान कल्याण मंत्री रामविचार नेताम यांनी सांगितले. तर या संमेलनात १३०० हून अधिक वैद्यांचे नोंदणी झाली आहे. मंडळ “नवरत्न योजना” अंतर्गत संपूर्ण राज्यभर हर्रा, बहेडा, आवळा, मुनगा यांसारख्या नऊ प्रकारच्या औषधी गुणांनी युक्त वनस्पती लावण्याची पुढाकार घेणार आहे असं छत्तीसगड आदिवासी स्थानिक आरोग्य परंपरा व औषधी पादप मंडळाचे अध्यक्ष विकास मरकाम यांनी सांगितले.
पद्मश्री मांझींनी सांगितला अनुभव
वैद्यांकडे कोणत्याही रोगाला मूळातून संपवण्याचे कौशल्य असते. योग्य माहिती आणि औषधींच्या संयोजनाने वैद्य अनेक प्रकारच्या कॅन्सरचाही उपचार करू शकतात असं सांगत पद्मश्री हेमचंद मांझी यांनी एक वैद्य म्हणून त्यांचे अनुभव शेअर केले. सोबतच राज्यातील त्या अंतर्गत भागांमध्ये, जिथे आधुनिक वैद्यकीय सेवा पोहोचू शकत नाहीत, तिथे पारंपरिक वैद्य आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाच्या माध्यमातून लोकांची सेवा करतात. या वैद्यांना सक्षम करणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे असं मुख्य प्रधान वनसंरक्षक व वनबल प्रमुख श्री व्ही. श्रीनिवास राव यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री साय यांच्या उपस्थितीत संमेलनात राज्यभरातून आलेल्या वैद्यांनी आपल्या कर्तव्याप्रती सत्यनिष्ठा आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी २५ वैद्यांना कच्च्या औषधी पिसाई मशीन प्रदान केल्या. कार्यक्रमात छत्तीसगड राज्य जैवविविधता मंडळाने प्रकाशित डॉ. देवयानी शर्मा यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात दुर्ग वनविभागातील पारंपरिक वैद्यांनी जतन केलेल्या पारंपरिक उपचार पद्धती आणि औषधी वनस्पतींचे संकलन करण्यात आले आहे.
संमेलनाला छत्तीसगड आदिवासी स्थानिक आरोग्य परंपरा व औषधी पादप मंडळाचे सीईओ जे. ए. सी. एस. राव यांनीही संबोधित केले. कार्यक्रमात छत्तीसगड राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष राकेश चतुर्वेदी, आयुष विद्यापीठाचे कुलगुरू प्रदीप कुमार पात्रा, राज्यभरातून आलेले वैद्यगण तसेच मान्यवर नागरिक उपस्थित होते.