
नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश…
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या स्थरावर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
मात्र या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार? की स्वबळाची चाचपणी होणार याबाबत अजून कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाही, किंवा महायुती आणि महाविकास आघाडीकडून तशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
मात्र या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा पक्षांतरणाला देखील वेग आला आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा देखील समावेश आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते महायुतीमध्ये प्रवेश करत असतानाच आता महायुतीमधल्या घटक पक्षातील नेते देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पहायला मिळत आहे.
शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, आणि मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजेखान जमादार यांच्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे दोन्ही पक्षप्रवेश पार पडले आहेत.
एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले होते, त्यातच महायुतीच्या घटक पक्षातील नेते देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची या महापालिका निवडणुकीसाठी युती होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.