
निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण ?
एखादा शस्त्र परवाना किंवा पासपोर्ट काढायचा असेल तर किती तरी अधिकाऱ्यांना भेटावे लागते. त्यातूनही बऱ्याचदा शस्त्र परवाना आणि पासपोर्ट मिळत नाही हा सर्वसामान्यांना अनुभव आहे.
गुंड निलेश घायवळ जो खूनाच्या आरोपात आहे. त्याला पासपोर्ट मिळतो, व्हिसा मिळतो हे राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही. गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना दिला जात असेल तर त्याचीही पार्श्वभूमीवर तपासली जाते. त्यामुळे वरदहस्त नक्कीच आहे. यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असू शकतात. निलेश घायवळचा उघडपणे वापर त्यांनी मार्केट कमिटीच्या इलेक्शनसाठी केला होता. विधानसभेच्या प्रचारात अधिकृतपणे निलेश घायवळ शिंदेचा प्रचार करत होते. त्याचे व्हिडिओ, फोटो, भाषणे आहेत असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, लोकशाही टिकवायची असेल तर गुंडाशाही बंद झाली पाहिजे. परंतु दुर्दैवाने या सरकारमध्ये गुंडाशाही मोठी झाली. चंद्रकांत पाटील यांच्या जवळचा समीर पाटील आणि निलेश घायावळचे निकटचे संबंध आहेत. त्याशिवाय हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यासोबतही निलेश घायवळ अधिवेशनात दिसतो. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना किती अधिकार आहेत माहिती नाही. परंतु राम शिंदेंचा दबाव आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा दबाव त्यामुळे गुंड सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाला असेल. याच्यामागे कोण कोण आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. सामान्य माणसाला अधिवेशनावेळी विधानभवनात येता येत नाही. मात्र निलेश घायवळ अधिवेशनात येतो, रिल काढतो, फोटो काढतो. हे सरकार सामान्य लोकांचे नसून गुंडाचे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच गुंड प्रवृत्तीचे लोक तुमच्यासोबत असतील तर कशाप्रकारे यांचा वापर केला जातो हे लोकांना कळते. जमिनी हडपण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. धाराशिव येथे पवन चक्क्या मोठ्या प्रमाणात आहेत, तिथे शेतकऱ्यांना धमकवावे लागते. कंपनीला धमकवावे लागते. नेते हे करत नाहीत तिथे गुंडाचा वापर केला जातो. आम्ही सोशल मीडियावर हे टाकलं आहे. जर दिवसाढवळ्या गुंडाचा वापर करणार असाल तर हे सरकार आपलेच आहे असं समजून हे गुंड गरिबांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतील. तेच पुण्यात होताना दिसते असंही आमदार रोहित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, माजी मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यासोबत निलेश घायावळ भूम परांडा या भागात शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी निलेश घायवळ याचा वापर करतात. पोलीस प्रशासन याबाबतीत काही करत नाही. ज्या ज्या लोकांना त्रास झाला, ते आता माहिती समोर देत आहेत. पोलीस अधीक्षकांना सांगूनही गुंडांवर कारवाई करत नाही. अहमदाबादवरून निलेश घायवळ लंडनला पळाला, त्याचे नातेवाईक तिथे सोडायले गेले होते. त्यामुळे अहमदाबादच्या तिथल्या लोकांनीही त्याला मदत केली असावी असा धक्कादायक आरोप रोहित पवार यांनी केला.