
जपानमधून मुलीला फोन केला अन्…
हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक Y Puran Kumar यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला १५ वेळा फोन करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सरकारी कामानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्यामुळे व्यस्त पत्नीला वाय पुरण कुमार यांचा फोन कॉल घेता आला नाही.
दुर्दैवाने त्यांच्यावर हळहळ व्यक्त करण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप वाय पुरण कुमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता.
सात ऑक्टोबर रोजी चंडिगड येथील सेक्टर ११ मधील निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या १७ वर्षीय मुलीला वडील घराच्या साऊण्डप्रुफ बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते.
पुरण कुमार यांनी ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी लिहिलेली मृत्युपत्र आणि सुसाईड नोट पत्नी आणि दोन सहकारी आयपीएस अधिकाऱ्यांना पाठवली होती. यावरुन ते आत्महत्येचा विचार करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
आत्महत्येच्या काही तास आधी पुरण कुमार यांनी आपल्या पत्नीला अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, असे तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी पत्नीला १५ वेळा फोन केला होता. मात्र आयएएस अधिकारी असलेली त्यांची पत्नी अमनीत पी कुमार हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासोबत जपानच्या सरकारी दौऱ्यावर होत्या. कामात व्यस्त असल्याने त्यांचे फोन कॉल्स कदाचित पोहोचले नाहीत.
आपल्या पतीचे अनेक मिस्ड कॉल्स पाहून अमनीत यांनी मुलीला वडिलांची चौकशी करण्यास सांगितलं. मुलगी घरी आली तेव्हा तिला वडील बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले. त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी पोलिसांना नऊ पानांची एक सुसाईड नोट आढळून आली आहे. यात कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. अलिकडेच राज्य सरकारच्या परवानगीशिवाय एका लाचलुचपत प्रकरणात त्यांचे नाव समाविष्ट केल्यामुळे ते अस्वस्थ होते.
माझे ‘महत्वाचे काम’ आहे, असं सांगत त्या सकाळी त्यांनी आपल्या स्वयंपाकीला बेसमेंटमध्ये कोणालाही येऊ देऊ नका, असं सांगितलं होतं.
कोण होते वाय पुरण कुमार?
२००१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले वाय पुरण कुमार रोहतकमधील सुनारिया येथील पोलिस केंद्राचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी आयएएस अधिकारी अमनीत पी कुमार या हरियाणा सरकारच्या परराष्ट्र सहकार्य विभागाच्या आयुक्त आणि सचिव आहेत. घटनेवेळी त्या मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासह जपान दौऱ्यावर गेल्या होत्या.