
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे.महाविकास आघाडीनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तर भाजपचाही आढावा बैठकांचा धडाका सुरु आहे. निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसने नुकतीच उत्तर महाराष्ट्रात बैठक घेतली. या बैठकीत मनसेला सोबत घेण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर ली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मनसेला सोबत घेण्याचे निश्चित केले आहे. पण त्याला महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा पाठिंबा असेल का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यावरून आतापासून मतभेदाची ठिणगी पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मनसेला सोबत घेण्याच्या भूमिकेबाबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंबंधीची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेला सोबत घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. पण सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र मनसेला सोबत घेण्याबाबत आग्रही असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधुंनी मुंबईत एकत्र मेळावा घेत त्यांच्या विरोधकांना चांगलाच धक्का दिला होते. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील उपस्थित होते.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणासाठी हा ऐतिहासिक प्रयोग मानला जाऊ शकतो. शिवसेना आणि महायुती दोघांनाही मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी मनसेला सोबत घेणयाच्या विचार केला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला हे अडचणीचे ठरु शकते, असेही बोलले जात आहे. याशिवाय ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास त्याचा मोठा परिणाम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मतदारांवरही होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी भाजपलाही त्याचा अप्रत्यक्ष फटका बसू शकते, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले आहे.
काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीपासून दूर ठेवण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर दबाव निर्माण होऊ शकतो, तर महाविकास आघाडीवरही त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय राजकारणात मुंबईत हिंदी भाषिकांवर झालेली मारहाण आणि मराठी प्रश्नावर आधारित आंदोलन हे मुद्दे चर्चेत आहेत. काँग्रेसने हिंदी पट्ट्यातील आपले राजकारण सांभाळण्यासाठी मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राजकीय गणितानुसार ‘कॅल्क्युलेटर’ निर्णय म्हटले जात आहे.
मनसेला दूर ठेवण्याच्या काँग्रेसच्या धोरणामुळे महाविकास आघाडीत नव्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः शिवसेनेची स्थिती एक प्रकारे सोय आणि गैरसोय दोन्ही अनुभवू शकते. या संदर्भात महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.