
धंगेकरांच्या मनात नेमकं काय; महायुती की महाविकास आघाडी ?
लोकसभा,विधानसभा निवडणुकीतील दोन सलगच्या पराभवानंतर रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडी,काँग्रेसची साथ सोडून एकदम शिवसेनेत दाखल झाले. त्यांची काम करण्याची पध्दत, आक्रमकता, राजकीय अनुभव या सगळ्याचा विचार करत मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत शिंदेंनी धंगेकरांचं मन वळवत अखेर त्यांना शिवसेनेत आणलंच.
एवढ्यावरच न थांबता शिंदेंनी धंगेकरांना मानाचं पान देत त्यांच्यासाठी महानगरप्रमुख हे विशेष पदही तयार केलं. आगामी महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकरांवर मोठी जबाबदारी असणार याचेच हे संकेत होते.पण शिंदेंचा प्लॅन फसला की काय अशी चर्चा दबक्या आवाजात पुण्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
शिवसेना बंडानंतर पुण्यात ठाकरे असो वा शिंदे दोन्ही शिवसेनेची अवस्था ही गोंधळलेली, एकमेकांत ताळमेळ नसलेली, नेतृत्वहीन,ढेपाळलेली अशीच पाहायला मिळाली आहे. एकेकाळी पुणे शहरात शिवसेनेची मोठी ताकद होती. पण आता मरगळ दूर करतानाच एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना धंगेकरांच्या डॅशिंग नेतृत्वात भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या तोडीस तोड मुकाबला करण्यासाठी तयार असावी अशी अपेक्षा आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंना पुणे महापालिकेचं राजकारण कोळून पिळालेला,महाविकास आघाडीच्या राजकारणाची जाण असलेला,तसाच वेळप्रसंगी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांवर नडणारा दबंग नेता रवींद्र धंगेकरांच्या रुपात मिळाला. पण झालं उलटंच. धंगेकर काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर आक्रमक होण्याऐवजी सायलेंट मोडवर गेले.
एरवी पुण्यातील छोट्या छोट्या प्रकरणांवरुन प्रशासन धारेवर धरणारे धंगेकर महायुतीत दाखल झाल्यानंतर सात ते आठ महिन्यांपासून निवांत होते.या काळात मोठ्या मोठ्या घटनांनी खळबळ उडाल्यानंतरही धंगेकर त्यांच्या विश्रांतीच्या मोडमधून बाहेर आलेच नाही. महानगरप्रमुख असलेल्या धंगेकरांनी शिवसेनेत दाखल झाल्यापासून ते आजतागायत बैठक, मेळावे, भेटीगाठी, महायुतीच्या नेत्यांसोबत एकत्रित कार्यक्रमात हजेरी, निवडणुकीसंदर्भात चर्चा असा कुठलाही अॅक्टिव्हपणा आजतागायत दाखवलेला नाही.
धंगेकरांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीविषयीही काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे कुठेतरी पुण्यात महायुतीतील शिवसेनेत आलेले धंगेकर हे मनानं अजूनही महाविकास आघाडी किंवा काँग्रेसमध्ये असल्याप्रमाणेच वागू लागले आहेत. भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढताना रवींद्र धंगेकरांना सलग दोन मोठ्या निवडणुका गमवाव्या लागल्या. त्या पराभवातून आलेली कटुता अजूनही धंगेकर मनानं विसरलेले नाहीत. त्याच भावनेमुळे धंगेकर हे मनानं महायुती आणि भाजप तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी फटकून वागताना दिसून येत आहे.
सध्याच्या मूडप्रमाणेच धंगेकर वागत राहिले, किंवा महायुतीतील प्रमुख नेत्यांशी वाद घालत राहिले तर एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) अडचण होऊ शकते. आता ते नेमकं शिंदेंच्या प्लॅननुसार काम करताहेत की स्वत:चं महायुतीत राहूनही स्वत:चंच राजकारण पुढे रेटताहेत याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
…म्हणून धंगेकरांना शिवसेनेत आणलं!
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले असले,तरी पुणे शहर आणि जिल्ह्यात मात्र एकनाथ शिंदेंचा पक्ष जरा गोंधळलेलाच राहिला.पुणे शहरात शिवसेनेचा मुख्य चेहरा कोण असा प्रश्न विचारला तर झटकन डोळ्यासमोर एखादं नाव घेण्यासारखं नव्हतं. पुणे शहरातील लोकसभा विधानसभा आणि पुणे महापालिका निवडणुकीच्या राजकारण अनुभवलेला आणि खांद्यावर पक्षाची पूर्ण जबाबदारी घेऊन लढलेला असा दमदार आणि ओळखीचा चेहरा नसणं हेच एकनाथ शिंदेंना वारंवार खटकत होतं. आणि आगामी महापालिका निवडणुकीत ही बाब शिवसेनेसाठी मोठी अडचण ठरणार होती. हीच बाब हेरून शिंदेंनी पुण्यात रवींद्र धंगेकरांना पक्षात आणलं आहे. हेच धंगेकर आता कुठेतरी पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत.
पुण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला, अन् धंगेकरांनी पुन्हा एकदा राजकारणातील एन्ट्र्रीसाठीचा तोच मोका हेरला. धंगेकर अॅक्टिव्ह झाले, पण ते महायुतीत असून महाविकास आघाडीचाच रोल करू लागले असल्याची चर्चा आहे. त्यांनी गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणात पहिलाच वार हा थेट पुण्यातील दुसरे ‘दादा’ असलेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर केला.
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी खळबळजनक दावा करतानाच पुण्यातील कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना निलेश घायवळचे निरोप जात असल्याचं म्हटलं आहे. धंगेकर यांनी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या पाटील नावाच्या व्यक्तीचा देखील उल्लेख केला.या पाटील नावाच्या व्यक्तीच्या फोनची तपासणी केली तर निलेश घायवळबाबतचे अनेक खुलासे होतील,असा दावाही धंगेकर यांनी केला आहे.
धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे,त्याच्या सर्व मोबाईलची आणि नंबरची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे अशी मागणीही केली.यानंतर घायवळ आणि तो कितीवेळा बोलला अन् दादांना (चंद्रकांत पाटील) कितीवेळा निरोप दिला, याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल, असंही त्यांनी आरोप केला.