
राज्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे, मराठवाड्यात तर पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे, सरकारकडून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी पॅकेजी घोषणा देखील करण्यात आली आहे, मात्र हे पॅकेज अतिशय कमी असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे, या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा पार पडला, या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती, या मोर्चात बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या मदतीवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही धार्मिक भावनेवर राजकारण करत आहात. लोकांचा जीव चालला आहे, त्यावर काहीच करत नाहीत. विरोधी पक्षनेतेपद नसलं तरी, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी आलाच पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. अधिकारी आला नाही तर शेतकऱ्यांचा आसूड काय असतो तो दाखवला पाहिजे. तुम्ही बाबूगिरी करू नका. शिवसेना पॅकेजवर लक्ष ठेवेल, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, दिवाळीच्या आधी पॅकेज द्या. मी दिवाळीनंतर महाराष्ट्रात फिरणार. प्रत्येकाला पैसे मिळाले की नाही हे बघेल. हाच शिवसेनेचा कार्यक्रम असेल. आम्ही गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पॅकेज मिळवून द्यायला तयार आहोत. मला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत, एकाने सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी म्हटलं मला फक्त आशीर्वाद द्या. मला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडत नाहीत, पद नसताना शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरलीय. निवडणूक येईल आणि जाईल, पण जीव गेला तर मिळणार नाही. अस्मानी आणि सुल्तानी संकट आलं आहे. अस्मानी संकट हातात नाही, पण सुल्तानी संकटाचा सामना करणं आपल्या हातात आहे. आपण या संकटाचा सामना करू, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, सरकारने आता जे पॅकेज जाहीर केलं आहे, ते फसवं पॅकेज आहे, असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.