
खरं कारण आलं समोर…
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटले. या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध पक्षातील मोठे नेते होते.
मात्र, या भेटीत निवडणूक आयुक्तांशी चर्चा पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते पुन्हा निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत. मात्र, या शिष्टमंडलात शरद पवार असणार नाहीत.
राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाला भेटत असताना शरद पवार हे गैरहजर राहणार असल्याचे कारण समोर आले आहे. आज (बुधवारी) शरद पवार यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम पुण्यात आहे. या कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत ते निवडणूक आयुक्तांना भेटणार नाहीत. ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
आगामी निवडणुकांपूर्वीची मतदार नोंदणी व मतदार यादीतील घोळ, दुबार नोंदणीची प्रकरणं, व्हीव्हीपॅटचा अभाव, सत्ताधाऱ्यांना पूरक ठरणारी व मतदारांना अन् विकासाला मारक ठरणारी प्रभाग पद्धती अशा अनेक बाबींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि, ह्याच मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी लिखित स्वरूपात निवेदन सुपूर्द करून ‘मुख्य निवडणूक अधिकाऱ्यां’समवेत प्रदीर्घ चर्चा केल्याचे शरद पवारांनी मंगळवारच्या भेटीनंतर सांगितले होते.
…योग्य ते बदल करतील
शरद पवारांनी मंगळवारीच स्पष्ट केले होते की, काही मुद्यांवर स्पष्टता येण्यासाठी’मुख्य निवडणूक आयुक्तां’शी चर्चा करण्याची गरज असल्याने बुधवारी उर्वरित चर्चा पार पडेल. पण स्वायत्त ‘निवडणूक आयोगा’सारख्या संविधानिक संस्थांबद्दल, त्यांच्या कारभाराबद्दल संबंध देशात शंका का घेतली जात आहे ह्याबाबत आयोगाने आत्मपरीक्षण करून योग्य ते बदल करणं व संविधानिक मूल्य जपणं ही आम्हा सर्वांची अपेक्षा असल्याचे म्हटले होते.