
बदल्यांच्या बाजारामुळे RTI कार्यकर्ते गलगली यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र !
प्रशासक राज असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या एकूणच कारभारात सावळा गोंधळ सुरू आहे. बीएमसीमध्ये बदल्या आणि बढत्यांसाठी लाखोंची बोली लावली जाते अशी बातमी ‘आपलं महानगर’ने 9 जून 2025 रोजी प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेचे मुख्यालय आणि वॉर्ड ऑफिस हादरले होते.
आता याच संदर्भात सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही आवाज उठवला आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मुंबई महापालिकेतील बदल्यांचा बाजार तत्काळ थांबवावा, अशी मागणी केली आहे.
तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेत प्रशासक राज आहे. निवडणूक न झाल्याने कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे बिल्डिंग प्रपोजल विभाग, एसआरए आणि वॉर्डातील असिस्टंट इंजिनीअरपद आदी क्रीमी विभागातील बदल्या आणि बढत्यांसाठी इंजिनीअर्सकडून लाखोंची बोली लावली जाते, अशी बातमी ‘आपलं महानगर’ने प्रसिद्ध केली होती. यात इंजिनीअर्सच्या बदल्या आणि बढत्यांचे रेटकार्डदेखील दिले होते. या बातमीनंतर मुंबई महापालिकेसह मंत्रालयात खळबळ उडाली होती. महापालिकेत दर 3 वर्षांनी रिवाजाप्रमाणे सेवाज्येष्ठता व आरक्षणनिहाय बदल्या-बढत्या केल्या जात असत. मात्र, तीन वर्षांपासून निवडणूक खोळंबल्याने यंदा जानेवारीपासून लक्ष्मीदर्शन, ओळखी, चिठ्ठ्या तसेच साम-दाम-दंड-भेद असा बदल्या-बढत्यांचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. ‘आपलं महानगर’ने ही बातमी इत्यंभूत दिली होती.
या पार्श्वभूमिवर आता आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही याच बदल्यांच्या बाजाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबई महापालिका (BMC) अंतर्गत सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील बदल्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या अखत्यारित आतापर्यंत 122 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आणखी 100 बदल्या प्रक्रियेत आहेत. यामुळे स्थानिक स्तरावर गोंधळ व अस्थिरता निर्माण झाली आहे.
हे लक्षात घेऊन अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकड़े तीन मागण्या केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे महापालिका अंतर्गत सुरू असलेला बदल्यांचा बाजार तत्काळ थांबवण्यात यावा, दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे मागील 6 महिन्यांत जेवढ्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्या सर्व बदल्यांना लगेचच स्थगिती द्यावी आणि पुढील काळात बदल्या करण्यासाठी स्वतंत्र आणि पारदर्शक समिती स्थापन करावी, अशी तिसरी मागणी केली आहे. समिती स्थापन केल्यास निष्पक्षता आणि जबाबदारी टिकून राहील, असा दावा गलगली यांनी केला आहे.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेवर बारीक लक्ष होते. मात्र, निवडणुकीनंतर ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी महापालिकेकडे फारसे लक्ष देणे बंद केले. त्या काळात एका बोलीबहाद्दर अतिरिक्त आयुक्ताने उखळ पांढरे केल्याची चर्चा आहे. ‘आपलं महानगर’नंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगले यांनीही मुंबई महापालिकेतील बदल्यांच्या बोलीकडे लक्ष वेधल्याने ‘आपलं महानगर’च्या बातमीच्या सत्यतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त भूषण गगराणी यांनी याआधी ‘आपलं महानगर’ला दिली होती.
अनिल गलगली यांनी उल्लेख केलेले अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यासाठी ते आजपासून (16 ऑक्टोबर) तीन आठवडे बिहारमध्ये असतील.