
फक्त 3 भारतीयांना जागा; कमिन्सने निवडलेल्या टीममधून बुमराहही बाहेर…
भारतविरुद्ध होणाऱ्या व्हाईट बॉल मालिकेत ऑस्ट्रेलियाचा वनडे कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे खेळताना दिसणार नाही. या मालिकेच्या सुरुवातीपूर्वी कमिन्सने भारत-ऑस्ट्रेलियाची एक संयुक्त वनडे प्लेइंग 11 निवडली आहे.
कमिन्सने आपल्या या संघात फक्त 3 भारतीय खेळाडूंना स्थान दिले असून 8 कांगारू खेळाडूंना सामावून घेतले आहे. सर्वांना आश्चर्यचकित करत कमिन्सने आपल्या या संघात विराट कोहली आणि रोहित शर्माला स्थान दिलेले नाही. तसेच जसप्रीत बुमराहलाही कमिन्सच्या प्लेइंग 11 मध्ये जागा मिळालेली नाही.
पॅट कमिन्सने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारत-ऑस्ट्रेलियाची संयुक्त प्लेइंग 11 निवडली. त्याने आपल्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि सचिन तेंडुलकर यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी कमिन्सने माजी कांगारू कर्णधार रिकी पाँटिंगची निवड केली आहे. चौथ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथला स्थान दिलं असून, पाचव्या स्थानावर शेन वॉटसनला ठेवले आहे. सहाव्या क्रमांकावर कांगारू कर्णधाराने मायकेल बेवनला जागा दिली आहे. विकेटकीपरसाठी कमिन्सने एमएस धोनीवर विश्वास दाखवला आहे.
पॅट कमिन्सने स्पिन विभागाची जबाबदारी शेन वॉर्नकडे सोपवली आहे. तर वेगवान गोलंदाजीसाठी त्यांनी तीन गोलंदाजांची निवड केली असून, त्यात एक भारतीय नाव आहे. कमिन्सने आपल्या प्लेइंग 11 मध्ये ब्रेट ली, झहीर खान आणि ग्लेन मॅक्ग्रा यांचा समावेश केला आहे. जगातील क्रमांक एक गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघात स्थान न देता कमिन्सने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
कमिन्सच्या गैरहजेरीत भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत वेगवान गोलंदाजीची धुरा मिचेल स्टार्ककडे असेल. स्टार्कला जोश हेजलवूडची साथ मिळणार आहे. स्टार्कने आपला शेवटचा वनडे सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळला होता. म्हणजेच तो जवळपास एका वर्षानंतर 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये मैदानात रंगतदार पुनरागमन करताना दिसणार आहे. एकदिवसीय मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.