
इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत; कायदा काय सांगतो…
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्यांनी आज विरोधी पक्षांची निवडणुकांबाबतची भूमिका मांडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली.
त्यानंतर मनसे आणि मविआची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा राज ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे या सगळ्यांनीच मांडला. राज ठाकरेंनी तर घोळ कसा आहे याची उदाहरणही वाचून दाखवली. मतदार याद्यांमधले घोळ संपत नाहीत तोपर्यंत म्हणजे किमान पुढचे सहा महिने निवडणुका घेऊ नये अशी मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी मी इतके गोंधळलेले विरोधक आयुष्यात पाहिले नाहीत असं म्हणत त्यांना उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?
इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या आयुष्यात पाहिलेले नाहीत. इतके मोठमोठे लोक त्यांना कुणाकडे गेलं पाहिजे? कायदा काय सांगतो हे माहीत आहे की नाही माहीत नाही. पण मला वाटतं की त्यांना सगळं माहीत आहे. पण पर्सेप्शन क्रिएट करण्याठी म्हणजे निवडणुकीत हरलो तर आधीच पर्सेप्शन तयार करत आहेत. विरोधक निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे गेले होते. त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काहीच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळा कायदा आहे. दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात वेगळं कमिशन आहे. काल सगळे महाभाग चोकलिंगम यांना भेटले. यांना भेटल्यावर त्यांना कळलं की दिनेश वाघमारेंना भेटायचं होतं. मग काहीतरी थातूरमातूर उत्तरं दिली. दोन वेगळ्या बॉडीज आहेत. आता आज वाघमारे यांना भेटले. तिथे काय मागणी करायची हे देखील विरोधकांना समजलं नाही. राज्याचा जो निवडणूक आयोग आहे तो निवडणुका घेतो. मतदार याद्यांच्या संदर्भात ते जी यादी आहे ती अॅडॉप्ट करतात त्यावर हरकती, सुधारणांची संधी दिली जाते. जर यांच्याकडे पुरावे असतील तर त्या कालावधीत ते विरोधकांनी दिले पाहिजेत. हे काही करायचं नाही. फक्त नरेटिव्ह तयार करायचं काम विरोधक करत आहेत.
मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आमचाही पूर्ण पाठिंबा-फडणवीस
मी आज कार्यक्रमांमध्ये होतो. मी काही विरोधक काय म्हणाले ते ऐकलं नाही. मी एवढं ऐकलं की कुणीतरी आम्हालाही आवाहन केलं आहे. आमचीही सगळं काही सहकार्य करण्याची तयारी आहे. निवडणुका चांगल्या झाल्या पाहिजेत. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करायची असेल तरीही आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची त्या गोष्टीलाही ना नाही. मतदार याद्यांमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नावं आहेत ती आज आहेत का? २० वर्षे झाली ती आहेत. तुम्ही सत्तेत इतकी वर्षे होतात तेव्हाही तेच होतं. आम्ही कितीवेळा आक्षेप घेतला आहे. त्यामुळे एक काही तरी काढून हेच कसं आणि तेच कसं विचारत आहेत. मला वाटतं की विरोधकांनी पराभव स्वीकारावा, जनतेत जावं आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं. पण कुणाचाही संविधानावर विश्वास नाही. संविधानाने तयार केलेल्या नियमांवर विश्वास नाही, संस्थांवर विश्वास नाही. फक्त नरेटिव्ह करण्याचं काम आहे. दोन दिवसांच्या त्यांच्या चकरा म्हणजे फियास्को आहेत. यातलं सगळं काही शरद पवारांना कळतं त्यांमुळेच ते तिथे गेले नाहीत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कुणी कुणासोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार आहे-फडणवीस
कुणालाही कुठेही जाता येईल. कुणीही कोणासोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठिशी आहे. आम्हाला हे माहीत आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा हे आत्ताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं, व्होटर लिस्टमध्ये गडबडी, गडबडी हे सगळं करणार आहेत. त्यांना रडण्याची सवय आहे त्यामुळे काही हरकत नाही असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.