
भाजप नेत्यांच्या वक्तव्याने CM पदावरून वाढला सस्पेंस…
बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. एनडीए आणि महाआघाडी दोघांनी जागा वाटपाचे गुऱ्हाळ न लांबवता झटपट निर्णय घेतला. उमेदवारांच्या नावाची घोषणा करून टाकली. आता नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तर पुढारी आता मतदारसंघ पिंजून काढत आहे. त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. पण मुख्यमंत्री पदावरून मात्र मोठा खल सुरू झाला आहे. महाराष्ट्रात जसे मोठे कार्ड खेळण्यात आले, तसाच डाव बिहारमध्ये (Bihar Election 2025) भाजप टाकेल, असा आरोप बिहारमधील विरोधक करत आहेत. त्याचवेळी भाजपच्या बड्या नेत्यांच्या त्या वक्तव्याने नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
प्रचाराचा चेहरा नितीश बाबू, पण CM होणार का?
NDA ने नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे एनडीएचा चेहरा नितीश कुमार असतील. प्रचारादरम्यान नितीश कुमार हेच प्रमुख असतील. पण त्यांना निकालानंतर मुख्यमंत्री करणार का? हा मोठा प्रश्न आहे. भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांनी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यांनी सस्पेन्स वाढवला आहे. दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री कोण होईल ते निकालानंतर आमदार निश्चीत करतील असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विचारल्या जात आहे.
नितीन गडकरी म्हणाले काय?
एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी, “बिहारमध्ये एनडीएचे सरकार निश्चीत सत्तेत येणार आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार हे एनडीए, भाजप आणि जेडीयूचे सर्वोच्च नेते मिळून ठरवतील. मी एकटा हा निर्णय करु शकत नाही. याविषयीचा निर्णय पार्लिमेंट्री बोर्डाकडून करण्यात येतो.”असे वक्तव्य केले.
अमित शाह यांची भूमिका काय?
पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांना जेव्हा नितीश कुमार हे मुख्यमंत्री असतील का असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा “कुणाला मुख्यमंत्री करणार मी कोण आहे? इतके पक्ष आहेत. निवडणुकीनंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री निवडण्यात येईल. पण ही निवडणूक आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि तेच आमच्या निवडणुकीचा चेहरा आहेत. असे संकेत त्यांनी दिले.