
जरांगे पाटलांनी शंका बोलून दाखवली !
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील ओबीसी मोर्चावर तीव्र टीका केली आहे. हा मोर्चा ओबीसी समाजाचा नसून एका विशिष्ट जातीचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
त्याचबरोबर, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा ‘मोठा गेम’ असू शकतो, अशी शंकाही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अंतरवाली सराटी येथे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आजचा (बीडमधील) मोर्चा ओबीसीचा नसून तो एका विशिष्ट जातीचा मोर्चा आहे. त्यात तुम्हाला विशिष्ट जातीचेच लोक दिसतील. त्यामुळे हा ओबीसींचा मोर्चा नाही आणि ओबीसींच्या हिताचं यांना काही देणं-घेणं नाही.
‘मोठा गेम’ असल्याचा इशारा
जरांगे पाटील यांनी या आंदोलनामागे राजकारण असल्याचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध केले आहे. “हा मोर्चा ओबीसींना बरबाद करणारे लोक काढत आहेत, ते ओबीसींचे खरे शत्रू आहेत. हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे की हा खूप मोठा गेम असण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, फडणवीस साहेबांपुढे ‘पुढे पुढे करायचं’, ‘गुलगुल गप्पा’ हाणायच्या, मोठेपण सांगायचं आणि त्यांच्यावरच वार करायचा. सरकारला किती डॅमेज करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न आहे, अशी आम्हाला शंका वाटते.
फडणवीसांनी तंबी द्यावी
छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याबद्दल जरांगे पाटील यांनी टीका केली आणि फडणवीसांनी त्यांना तंबी देण्याची मागणी केली. “सरकारमध्ये याच लोकांचे मोर्चे काढणारे लोक आहेत, अजित दादांचे. त्यांना हे कळत नाही का? असा सवाल त्यांनी केला.
जरांगे पाटील यांनी यावेळी फडणवीसांबद्दल शंका नसल्याचे स्पष्ट केले, परंतु त्यांना एक अपेक्षा व्यक्त केली. फडणवीस साहेबांनी दोन्हीकडे गोड बोलायचं आणि काही मराठ्यांना शंका येईल असं पाऊल उचलू नये, अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल शंका अजिबात नाही, असे ते म्हणाले.
ओबीसींचे ३२ टक्के आरक्षण याच लोकांनी वेगळं केलं आणि गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या जागा मिळू दिल्या नाहीत, त्यामुळे हे लोक ओबीसींचे कल्याण होऊ देणारे नाहीत, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली.