
राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक भागात प्रत्येक जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे पक्षांतराचे प्रमाणही वाढू लागले आहे. अशातच सोलापुरमधील सांगोल्यात शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून दीपक साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आज या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दीपक साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांच्या काल दुपारी झालेल्या बैठकीनंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक साळुंखे यांनाही ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पक्षापासून दूर राहणेच पसंत केले होते. या सर्व घडामोडींनंतर अखेर त्यांनी ठाकरे गटाला राम राम करत भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला.
सांगोला तालुक्यातील आगामी निवडणुकांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे राजकीय समीकरणातही मोठे बदल होणार आहेत. यात माजी आमदार दीपक साळुंखे यांचा जवळा जिल्हा परिषद गट खुला झाला आहे. या गटातून दीपक साळुंखे यांचे चिरंजीव यशराजे साळुंखे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे.
माजी आमदार शहाजी पाटील यांचा हक्काचा महूद गट इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित झाल्याने त्यांचे पुत्र दिग्विजय पाटील यांची अपेक्षित उमेदवारी हुकली आहे. आरक्षण बदलामुळे पाटील कुटुंबाची राजकीय गणिते बिघडली असून, दिग्विजय पाटील यांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.
महूद गटात पाटील कुटुंबाचा प्रभाव कायम असला, तरी या आरक्षण बदलामुळे त्यांच्या राजकीय योजनांवर पाणी फिरले आहे. दिग्विजय पाटील हे आगामी निवडणुकीत सक्रिय होण्याच्या तयारीत होते; मात्र गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने त्यांच्या उमेदवारीची शक्यता संपुष्टात आली आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीमुळे नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली असून, पाटील समर्थक आता पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी हालचाली करत आहेत.