
बीड येथील महाएल्गार मेळाव्यात राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री तथा ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माजीमंत्री, आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे “तुम्हीच गोपीनाथराव मुंडेंचे वारसदार” म्हणत ओबीसींचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवत “काम” दिले.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्या रायगड येथील एका कार्यक्रमात माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाने एखादी जबाबदारी सोपवावी, अशी मागणी केली होती.
जबाबदारी म्हणजे मुंडेंना पुन्हा मंत्रीपद हवे आहे आणि त्यांचे मंत्रीपदासाठी पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याजवळ असलेले ‘वजन’ घटले असल्यानेच तटकरे यांच्या रायगडमध्ये जाऊन मागणी करण्याची वेळ मुंडेंवर आली, असे त्यांच्या विधानाचे अर्थ काढले गेले. त्यानंतर लगेचच मंत्री भुजबळ यांनी मंत्रीपद मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी ओबीसींच्या चळवळीत काम करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाच्या काहीच दिवसात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या सावरघाट येथील अलिकडच्या दसरा मेळाव्यात ओबीसींच्या हक्कासंदर्भात जाहीरपणे भूमिका घेऊन, आमच्या ताटातले काढून इतरांना दिलेले चालणार नाही, असे विधान केले होते. आम्ही मराठा समाजाचे विरोधक नाहीत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी भूमिका मांडली, आवाज उठवला, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली होती.
त्यानंतर बीड येथे निघालेल्या बंजारा समाजाच्या मोर्चातही धनंजय मुंडे थेट सहभागी झाले होते. बंजारा समाजाकडून होणाऱ्या मागण्यांचे समर्थनही केले होते. बीडच्या ओबीसींच्या महाएल्गार सभेसाठी गर्दी जमा व्हावी, यासाठी धनंजय मुंडे यांचे समर्थक सक्रीय होते. या महाएल्गार सभेत मुंडे यांनी पुन्हा मनोज जरांगे यांनाच लक्ष्य केले. जरांगेंची खिल्ली उडवत केलेल्या टीकेतून टाळ्याही मिळवल्या. ओबीसींमधून अन्य समाजाला आरक्षण मिळाले तर स्पर्धा परीक्षांमधील ‘कटऑफ’ कमी झाला, असे सांगत मुंडे यांनी यासंदर्भातील राज्यनिहाय आकडेवारीच सादर केली. केंद्राने आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाने जरूर घ्यावा, परंतू त्यांना ओबीसींमधूनच आरक्षण हवे असेल तर त्याला विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
मुंडेंच्या या भूमिकेनंतर मंत्री भुजबळ यांनी, “तुम्हीच गोपीनाथरावांचे वारस” असा थेट उल्लेख केला. या महाएल्गार मेळाव्यास गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित नव्हत्या. यापूर्वीच्या बीड येथील व अंबड जवळील मेळाव्यासही पंकजा मुंडे हजर नव्हत्या. पक्षीय पातळीवरील काही शिस्त पाळण्याच्या उद्देशातून पंकजा मुंडे यांनी मेळाव्याकडे जाणे टाळले, असे सांगितले जते. असे असले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलेले धनंजय मुंडे हे सध्या केवळ आमदार असल्याने त्यांना चळवळीतील “गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार’ ठरवून भुजबळ यांनी एकप्रकारे ओबीसींचे त्यांच्यानंतर नेतृत्व बहाल करून “काम”च सोपवल्याचे मानले जात आहे.धनंजय मुंडे हेही आता नामोल्लेख टाळून मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट टीका करत आहेत.