
गिरीश महाजनांचं सूचक विधान…
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महाविकास आघाडी पासून रोखण्याचे प्रयत्न आहेत का?. याबाबत भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत का? असे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज नाशिकला होते.
यावेळी त्यांनी रामकुंडावरील वस्त्रांतरगृह पाडकामाची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मराठा मते एकजूट होतील. त्यामुळे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील होण्यापासून रोखण्याचे प्रयत्न आहेत का?. अशी विचारणा करण्यात आली. या प्रश्नावर जलसंपदा मंत्री महाजन सूचक हसले.
राज ठाकरे ऑपरेशनबाबत विचारल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले, “त्या ऑपरेशनमध्ये मी नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ऑपरेशनमध्ये असतील. मंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र प्रदेश हे वरिष्ठ नेते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये माझे बारीक लक्ष आहे. सर्व ठिकाणी भाजपला चांगले यश मिळेल. विरोधकांनी त्याची चिंता करू नये.
दरम्यान, महाविकास आघाडीत राज ठाकरे आल्यास नाशिकसह मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महापालिकेत राजकीय चित्र बदलेल, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे की नाही, असा प्रश्न पडतो, असं महाजन म्हणाले. महाविकास आघाडीने काहीही दावे करोत, निवडणुका जवळ आहेत. घोडा मैदान समोर आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर सर्वकाही स्पष्ट होईल. महाविकास आघाडीने मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली या महापालिकांवर दावा केला आहे. मात्र यातील एकतरी महापालिकेत त्यांनी निवडून येऊन दाखवावे. त्यांना काहीही प्रतिसाद मिळणार नाही, असा दावा महाजन यांनी केला.