तेलंगाणा सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेलंगाणातील काँग्रेस सरकार नेमकं कोणत्या नेत्याला मंत्री होण्याची संधी देणार?
असे विचारले जात होते. असे असतानाच आता तेथील सत्ताधारी काँग्रेसने सर्वांनाच अचंबित करणारा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेथे विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेलेल्या माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिपद मिळणार आहे. आगामी काळात होणारी ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अझरुद्दीन यांना मंत्रिपद दिले जाणार
मिळालेल्या माहितीनुसार येत्या 31 ऑक्टोबर 2025 रोजी अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हीच बाब लक्षात घेता अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्त्व म्हणून अझरुद्दीन यांना मंत्रिपद दिले जाणार आहे, असे सांगितले आत आहे. ज्युबली हिल्स या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. ही निवडणूक जिंकायची असेल तर मुस्लिमांची मतं मिळणं गरजेचे आहे. त्यामुळेच काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
ऑगस्टमध्ये मिळाली आमदारकी
अझरुद्दीन यांना ऑगस्ट महिन्यात काँग्रेसने विधानपरिषदेत आमदारकी दिली होती. अझरुद्दीन हे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत. त्यांचे नाव सुचवण्याआधी काँग्रेसने कोडांदारम आणि अमेर अली खान यांच्या नावांची राज्यपालांकडे शिफारस केली होती. मात्र राज्यपालांनी या नेत्यांची शिफारस फेटाळून लावली होती. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने कोडांदारम आणि अझरुद्दीन यांचे नाव सुचवले होते. ही शिफारस मान्य केल्यानंतर आता अझरुद्दीन आमदार आहेत. लवकरच ते मंत्री होतील.
मंत्रिमंडळात मुस्लीम नेत्याला स्थान नाही
तेलंगाणातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी म्हणून एकाही मुस्लीम नेत्याचा समावेश नव्हता. त्यामुळे अल्पसंख्याकांमध्येही काहीशी नाराजी होती. हीच नाराजी दूर करण्यासाठी तसेच सर्व वर्गाचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात असावेत यासाठीही अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अझरुद्दीन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 16 वर पोहोचेल. आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 18 मंत्री असू शकतात. रेवंत रेड्डी यांनी 7 डिसेंबर 2023 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत असून अझरुद्दीन यांनी मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यामुळे आता या निर्णयाचा काँग्रेसला ज्युबली हिल्सच्या पोटनिवडणुकीत किती फायदा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


