अर्शद वारसीने सांगितली आईची अखेरची आठवण; आजही होतो पश्चात्ताप !
पडद्यावर विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता अर्शद वारसी त्याच्या खासगी आयुष्याविषयी फार क्वचितच व्यक्त होतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, तो पहिल्यांदाच त्याच्या आईबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
अर्शद 14 वर्षांचा असतानाच त्याच्या आईवडिलांचं निधन झालं होतं. “मी आतून पूर्णपणे खचलो होतो, परंतु जगासमोर मी स्वत:ला खूप स्ट्राँग दाखवत होतो”, असं अर्शद म्हणाला. अर्शदने त्याच्या आईच्या अखेरच्या क्षणातील अशी आठवण सांगितली, ज्यामुळे त्याला आजही पश्चात्ताप जाणवतो.
राज शमानीच्या पॉडकास्ट मुलाखतीत अर्शदम्हणाला, “कुटुंबीयांसोबत माझ्या फारशा आठवणी नाहीत. कारण माझं बालपण बोर्डिंग स्कूलमध्येच गेलंय. त्यामुळे लहानपणाचा कधी विषय निघाला, तर मला माझ्या शाळेची फार आठवण येते. कारण मी वयाच्या आठव्या वर्षीच बोर्डिंग स्कूलमध्ये गेलो होतो.” यानंतर पुढे त्याने आईच्या अखेरच्या क्षणातील हृदय पिळवटून टाकणारी आठवण सांगितलं. ते अखेरचे क्षण आठवले की आजही खूप त्रास होतो, असं तो म्हणाला. अर्शदच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईची किडनी निकामी झाली होती. त्यांना डायलिसिसवर रहावं लागलं होतं.
माझी आई सामान्य गृहिणी होती. ती जेवण खूप छान बनवायची. त्यांची किडनी फेल झाल्याने डायलिसिसवर राहावं लागलं होतं. त्यांना पाणी प्यायला देऊ नका, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. परंतु ती सतत आमच्याकडे पिण्यासाठी पाणी मागायची. मी तिला सतत नकार द्यायचो. निधनाच्या आदल्या रात्री तिने मला बोलावलं आणि पुन्हा माझ्याकडे पाणी मागितलं. त्याच रात्री तिने अखेरचा श्वास घेतला आणि त्या घटनेचा परिणाम माझ्या मनावर खोलवर झाला होता. माझ्या डोक्यात आजही असा एक विचार येतो की, जर मी त्या रात्री आईला पाणी दिलं असतं आणि त्यानंतर तिचं निधन झालं असतं, तर मला आयुष्याभर त्याच गोष्टीने सतावलं असतं की आईला मी पाणी दिल्याने तिचं निधन झालं”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
याविषयी त्याने पुढे सांगितलं, “आता मला असं वाटतं की आईला मी पाणी द्यायला पाहिजे होतं. तेव्हा मी लहान होतो आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते मी ऐकलं होतं. आज मी माझे निर्णय घेऊ शकतो. माझ्या आयुष्यातील अखेरचे क्षण रुग्णालयात घालवण्यापेक्षा मी कुटुंबीयांसोबत घालवणं पसंत करेन. आपण कधीच आजारी व्यक्तीचा विचार करत नाही. आपण फक्त आपल्या अपराधीपणाच्या भावनेतून निर्णय घेतो. आईवडिलांच्या निधनानंतर मी फारसा रडलो नाही. कारण मी स्ट्राँग आहे, असं मला दाखवायचं होतं. परंतु काही दिवसांनंतर जेव्हा मला जाणवलं की खरंच आपल्याजवळ आई किंवा बाबा नाहीत, तेव्हा मी धाय मोकलून रडलो होतो.


