भाजप आमदारानं काढलं जुनं प्रकरण बाहेर; मंत्रिपदावर टांगती तलवार !
माणिकराव कोकाटे हे कृषिमंत्री असताना त्यांच्या विधानांमुळे आणि नंतर सभागृहामध्ये पत्त्यांचा खेळ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भवऱ्यामध्ये सापडले होते. माणिकराव कोकाटे यांच्या बद्दलचा हा वाद मोठ्या प्रमाणात चर्चेला गेल्यानंतर कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रिपद काढून घेण्यात आलं.
आणि यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता या क्रीडामंत्र्याच्या पदावरूनही कोकाटे यांची हकालपट्टी करण्यात यावी,अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात अपहार केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर आता भाजपचे (BJP) विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी थेट क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप केले. भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणारा क्रीडामंत्री राज्याला नको असे म्हणत त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
याबाबत बोलताना संदीप जोशी म्हणाले, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडा मंत्री काही क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करत आहेत. या माध्यमातून कोकाटे हे ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी तेरा कोटींचा हिशोब दिलेल्या नाही त्यांना ते पाठीशी घालत आहे. हा स्पष्ट संदेश क्रीडा मंत्र्यांकडून दिला जात आहे.
या तेरा कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्या सचिवांसाठी क्रीडामंत्री वारंवार फोन करत आहेत, हे चुकीचं आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संघटना या ऑलिम्पिकच्या निवडणुकीत ताकदीने उतरत आहोत. मात्र, क्रीडा मंत्री जर अशा पद्धतीने भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहत असतील तर त्यांनी क्रीडा मंत्रालय सोडून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र ऑलम्पिक अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशी लढत होणार आहे. संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दोघांनी अर्ज केले होते. शनिवारी (ता.18) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, दोघेही आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दोघांमध्ये थेट सामना होणार आहे.


