पोलिसांनी एन्काउंटर केलेला रोहित आर्या नेमका कोण आहे…
मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मुंबईच्या पवईमधील आर ए स्टूडिओमध्ये रोहित आर्या याने काही मुलांना डांबून ठेवलं होतं. घटनेची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली, पोलिसांनी या स्टूडिओला घेराव घातला, त्यानंतर पोलिसांनी आरोपी रोहित आर्या याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्या याचा मृत्यू झाला आहे.
या स्टूडिओमधून 17 मुलं आणि एक नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार एका वेबसिरीजच्या चित्रिकरणासाठी या स्टूडिओमध्ये ऑडिशन सुरू होतं. आज सकाळी 100 पेक्षा जास्त मुलं या ऑडिशनसाठी दाखल झाले होते. त्यानंतर रोहित आर्या याने यातील 80 मुलं घरी परत पाठवले, तर 17 मुलांसह एका नागरिकाला त्याने स्टूडिओमध्ये डांबून ठेवलं होतं, या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. मुलांची सुटका करण्याच्या प्रयत्नामध्ये झालेल्या गोळीबारात रोहित आर्या याचा मृत्यू झाला आहे.
कोण आहे रोहित आर्या?
रोहित आर्या हा पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे, त्याच्याकडे पोलिसांना एक एअरगन देखील सापडली आहे. पीएससी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे दोन कोटी रुपये सरकराने थकवल्याचा आरोप देखील रोहित आर्या याने केला होता, त्याने दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री असताना केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण देखील केलं होतं, त्यामुळे तेव्हा तो चर्चेत आला होता.
दरम्यान दीपक आर्या याने जेव्हा मुलांना ओलीस ठेवलं, त्याचवेळी त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता, ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की मला मरायचं नाही, मला आत्महत्या करायची नाही. मी काही दहशतवादी नाही, माझ्या काही मागण्या आहेत, त्यासाठी मी या मुलांना डांबून ठेवलं आहे. जर मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण स्टूडियोला आग लावेल अशी धमकी देखील रोहित आर्या याने दिली होती. त्यानंतर मुलांची सुटका प्रयत्नामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारत त्याचा मृत्यू झाला आहे, पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली आहे.


