सातबारा कोरा करावाच…
शेतकरी कर्जमाफीवरून राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे, शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर दौरे काढले, काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर उपोषण देखील केलं होतं, त्यावळी देखील सरकारकडून बच्चू कडू यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अजूनही कर्जमाफी झालेली नाही, दरम्यान त्यानंतर आता बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अखेर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली, बुधवारी नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला प्रचंड गर्दी झाली.
दरम्यान बुधवारीच कोर्टाकडून बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळ खाली करावं असे आदेश देखील आले होते, त्यानंतर बच्चू कडू हे अधिकच आक्रमक झाले, त्यांनंतर त्यांनी थेट पोलिसांना एक पत्र लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की एक तासांच्या आत आम्हाला अटक करा अन्यथा आम्ही पुन्हा एकदा आंदोलस्थळी जाऊ, दरम्यान यासोबतच त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर तोडगा निघाला नाही तर रेलरोको करण्याचा देखील इशारा दिला होता.
अखेर सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना बैठकीसाठी मुंबईत बोलावलं. आता या बैठकीमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सरकारकडून आता 30 जून 2026 ची कर्जमाफीसाठी डेडलाईन देण्यात आली आहे, 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करून असं आश्वासन या बैठकीत बच्चू कडू यांना मिळालं आहे, यावर आता बच्चू कडून यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
आम्ही तारखेसाठी आलो होतो, सरकारकडून तारीख भेटली आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द दिला आहे. आम्ही देखील तारखेसाठी आलो होतो, योग्य वेळ कधी आहे त्यांनी ती योग्य दिलेली आहे. त्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत. अजूनही इतर काही बाबींवर चर्चा होणार आहे. ज्यांना एक लाख रुपये पेन्शन असते, जे मोठे व्यापारी आहेत अशा लोकांना कर्जमाफीची गरज नाही, सातबारा कोरा होणारच सातबारा कोरा करावाच लागेल, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.


