संकटकाळात दिला आधार; अमेरिकेच्या धमकीला रशियानं झुगारलं !
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरिबियन बेटावरील देशाची ऊर्जा नाकेबंदी केली होती. जगातील कुठल्याही देशाला क्यूबाला तेल देण्याविरोधात धमकी दिली होती. ट्रम्प यांच्या धमकीमुळे अनेक देशांनी क्यूबाला मदत करणे टाळले.
इंधनाच्या तुटवड्यामुळे क्यूबामधील परिस्थिती बिकट झाली. मात्र ट्रम्प यांच्या धमकीला झुगारून रशियाने ऊर्जा संकटाशी झुंजणाऱ्या क्यूबा देशाला कच्च्या तेलाचा टँकर पाठवला आहे. हा तेल टँकर क्यूबाला पोहचल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया रशियाने दिली.
रशियाने या महिन्याच्या सुरुवातीला अनातोली कोलोडकिन नावाचा एक निर्बंध घातलेला तेल टँकर क्यूबाला पाठवला होता. ज्यात जवळपास ७.३ लाख बॅरेल कच्चे तेल होते. अमेरिकेकडून क्यूबा देशाची ऊर्जा कोंडी करण्यात येत होती. क्यूबाला कुणीही तेल पाठवू नये असं अमेरिकेने बजावले होते. मात्र व्हेनेझुएलाकडून क्यूबाला तेल पुरवठा सुरू होता. परंतु तिथेही ट्रम्प यांनी सैन्य कारवाई करत मादुरो यांना अटक केली आणि तिथल्या तेलावर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे क्यूबावरील संकट वाढले. ऊर्जा संकटामुळे देशात वीज गायब झाली. अनेक अडचणींचा सामना तिथल्या लोकांना करावा लागला. अशा परिस्थितीत रशिया क्यूबा देशाच्या मदतीसाठी धावून पुढे आला.
शिपिंग डेटानुसार, रशियाचा तेल टँकर सोमवारी क्यूबाच्या उत्तर पूर्वेकडील किनाऱ्यावर पाहायला मिळाला. रशिया क्यूबाचा मित्र देश आहे. त्यांनी ऊर्जेवरील निर्बंधावर टीका करत अमेरिकेला लक्ष्य केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांना धमकी देत क्यूबाला तर तेल पाठवले तर त्यांच्यावर टॅरिफ लावू असा इशारा दिला होता. त्यामुळे अनेक देशांनी क्यूबा मदत करण्यापासून काढता पाय घेतला. या परिस्थितीत रशियाने क्यूबाला कच्च्या तेलाचा टँकर पाठवला आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेत रशियाने पाठवलेल्या टँकरवर आक्षेप नाही असं विधान केले.
दरम्यान, या परिस्थितीत रशियन तेल क्युबामध्ये पोहोचले आहे. आपल्या क्युबन मित्रांना मदत करणे हे रशिया आपले कर्तव्य मानतो.पेट्रोलियम उत्पादनांची ही खेप बेटावर पोहोचल्याचा आम्हाला आनंद आहे असं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले. जानेवारी महिन्यापासून क्युबाला इतका मोठा तेलपुरवठा मिळालेला नाही. क्युबा पूर्वी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करत असे परंतु जानेवारीच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी एका सैन्य कारवाईद्वारे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण घडवून आणले. मादुरो सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि अमली पदार्थांचे आरोप आहेत. मादुरो यांना हटवल्यानंतर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे क्युबाचा व्हेनेझुएलाकडून होणारा तेलपुरवठा खंडित झाला. यामुळे क्युबामध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आणि दररोज वीजपुरवठा खंडित होऊ लागला.
