 
                मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी लोकलने येणार
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी समोर गुरुवारी (ता.30 ऑक्टोबर) मनसेच्या कार्यकर्त्यांना व्होट चोरीच्या मुद्द्यावरुन मार्गदर्शन केलं. ईव्हीएमच्या मदतीने मतांची कशी लूट होऊ शकते, याचंही प्रात्यक्षिकांसह दाखवले. यावेळी राज ठाकरे यांनी येत्या 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करतानाच ते लोकलनेच येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
‘सीएम पदासाठी शिंदेंची किती चाटूगिरी?’ नमो टुरिझम सेंटरवरून राज ठाकरेंचा संताप
ईव्हीएम मशिनवरून राज ठाकरे यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी त्यांनी नमो टुरिझम सेंटरवरून राज्याचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज एका वर्तमान पत्रात बातमी आली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो टुरिझम सेंटर काढणार म्हणून पण मी आताच सांगतो सत्ता असो नसो वर खाली कुठेही बांधलं की फोडून टाकणार. हे खात एकनाथ शिंदेंचं आहे. मुख्यमंत्री पदासाठी एवढी चाटूगिरी सुरु आहे की शिवाजी महाराजांच्या गडावर मोदींच्या नावाने टुरिझम सेंटर? बांधलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांना देखील हे माहीत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे व मेहबूब शेख यांना फलटण येथून रसद पुरवली जातेय : भाजपचा दावा
फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात वादळ उठले आहे. या प्रकरणा गोपाल बदने व प्रशांत बनकर यांना पोलिसांनी अटक केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी गंभीर आरोप केले होते. याचदरम्यान जयश्री आगवणे यांनी तर त्यांचे पती दिगंबर आगवणे यांना रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनीच खोट्या केसमध्ये अडकवले असा आरोप केला होता. यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या नेते माजी नगरसेवक अनुप शहा व जयश्री आगवणे यांचे पती संतोष आगवणे यांची बहीण सुनीता आगवणे यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी, सुषमा अंधारे व मेहबूब शेख यांना फलटण येथून रसद पुरवली जात असल्याचा आरोप केला आहे.
रोहित आर्याचा एन्काऊंटर, ‘घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी’: केसरकर
मुंबईतील पवईमध्ये रोहित आर्या या व्यक्तीने सुमारे 20 लहान मुलांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलांची सुटका केली. दरम्यान ओलीस ठेवलेल्या मुलांना वाचविताना पोलीस आणि आरोपी रोहित आर्यामध्ये चकमक उडाली होती. त्यामध्ये त्याला गोळी लागली तर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यांनी, घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. रोहित आर्या हे सामाजिक कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी अस पाऊल उचलणं हे चुकीचं आहे. त्यामुळे पुढील सर्व प्रकार उद्भवला. एकंदरीत झालेला प्रकार दुर्दैवी असल्याचे केसरकर यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या गाडीवर शाही फेकण्याचा प्रयत्न
परभणीच्या पालकमंत्री आज गंगाखेड दौऱ्यावर होत्या त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यासोबतच जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी कर्जमाफी आणि अनुदानावरून शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी त्यांच्या गाडीवर शाही फेकण्याचा प्रयत्न गंगाखेडमध्ये करण्यात आला. पण पोलिसांनी या प्रयत्न घाणून पाडत दोघा जणांना ताब्यात घेतले. यावर बोर्डीकर यांनी ते लोक विरोधातील असतील असं असे म्हटलं आहे.
गुजरातच्या मासेमारी बोटी मीरा-भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर आश्रयाला
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे समुद्रात लाटांचा जोर वाढला असून मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुजरात राज्यातील जाफराबाद येथून निघालेल्या अनेक मासेमारीच्या बोटीने सध्या मीरा-भाईंदरचा उत्तन किनाऱ्यावर आश्रय घेतलेला आहे. वादळाचा धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मनसेचा थोड्याच वेळात मुंबईत मेळावा सुरु होणार
मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यातून मतदार यादी घोळासंदर्भात प्रेझेंटेशन दिलं जाणार आहे. शिवसेना UBT च्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी मतदार यादी घोळाचं प्रेझेंटेशन दिलं होतं. आता राज ठाकरेही या मेळाव्यात मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यावर सादरीकरण करणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सोबतच 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या तयारीबाबतही आढावा घेतला जाणार आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कंत्राटदार रोहित आर्य यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कंत्राटदार रोहित आर्य यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ‘दोन कोटी रुपये थकल्याचा आरोप रोहित आर्य याचा होता.’ या आरोपासह आर्य यांनी केसरकर यांच्या घरासमोर उपोषण केल्याने खळबळ उडाली आहे. ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून काही कामे देण्यात आली होती, मात्र त्याचे पैसे थकवल्याचा आरोप आर्य यांनी केला आहे. तर, संबंधित कंत्राटदाराने थेट लोकांकडून पैसे घेतल्याचे खात्याचे मत असून, हा वाद विभागाशी बोलून सोडवावा, अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात येत आहे. कोणालाही ओलीस धरणे चुकीचे असल्याचे मतही या प्रकरणी व्यक्त केले जात आहे.
अमोल वाघमारेंनी केला एन्काऊंटर
सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्य याचा एन्काऊंटर केल्याचे समजते. मुलांची सुटका करत असताना रोहितकडून मुलांना धोका निर्माण झाल्यानंतर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रोहित आर्याचा एन्काऊंटर
ओलीस ठेवलेल्या मुलांना वाचविताना पोलीस आणि आरोपी रोहित आर्यामध्ये चकमक उडाली होती. त्यामुळे रोहितला गोळी लागली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                