तरीही PM मोदींनी उद्धव ठाकरेंच्या नेत्यासाठी लिहिली खास पोस्ट !
महाराष्ट्राच्या राजकारणात 25 एकत्र नांदत आलेल्या युतीला 2014 2019 मध्ये असे तडे गेल्यानंतर भाजप-शिवसेनेत वितुष्ट आले. दोन्ही बाजूनं राजकारण आणि टीकेची पातळी बदलली.
याचदरम्यान, खासदार संजय राऊतांनी मिळेल त्या संधीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी- केंद्रीय मंत्री अमित शाह भाजपवर जिव्हारी लागणारे शाब्दिक हल्ले चढवण्याची एकही संधी सोडलेली नाही. पण तरीही आता सगळा राजकीय विरोध विसरुन PM मोदींनी गंभीर आजारानं ग्रासलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेल्या खासदार संजय राऊतांसाठी (Sanjay Raut) खास ट्विट केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या प्रत्येक संकटात त्यांची ढाल बनत किल्ला लढवलेल्या, गेल्या सुमारे पाच ते सहा वर्षांपासून दररोजच्या पत्रकार परिषदेतून केंद्रातील मोदी सरकारला आणि राज्यातील महायुतीला घाम फोडणारे,कधी कधी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही फटकारणारे शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून खासदार संजय राऊत यांची महाराष्ट्राला ओळख आहे. पण आता त्यांनीच प्रकृती बिघाडाचं कारण देत सार्वजनिक जीवनापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची पोस्ट व्हायरल होत असतानाच आता पंतप्रधान मोदी यांनीही राऊतांसाठी ट्विट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासाठी शुक्रवारी (ता.31) खास ट्विट केलं आहे. मोदींनी ”संजय राऊतजी,सध्या तुमची प्रकृती ठीक नसल्याचं कळालं. तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना” करतो अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर केली आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांकडून संजय राऊतांच्या ट्विटवर उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या जात असतानाच पंतप्रधान मोदींनीच पोस्ट केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते आजतागायत महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी पत्राचाळ प्रकरणात अगदी 104 दिवस जेलवारीही केली आहे. पण तरीही राऊतांनी आपली टीकेची धार कधी कमी केली नाहीउलट ती आणखी टोकदार केली.
तसेच त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला न जुमानता उद्धव ठाकरेंची संकटकाळात साथ देण्यात कोणतीही कसर सोडली नसल्याचंच पाहायला मिळालं. पण शुक्रवारी त्यांनी केलेल्या अचानक पोस्टमुळे ठाकरेंची शिवसेनेसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासाठी लवकरात लवकर बरे व्हा असे सांगतानाच मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत भावनिक पोस्ट केली आहे. आम्ही सगळे आपली वाट बघत आहोत..! असंही त्यांनी म्हटलं आहे.
अंधारे यांनी केलेल्या ट्विटमध्ये मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, लवकर बरे व्हा.. आम्हाला कल्पना आहे की सार्वजनिकरित्या जरी आपण मिसळू शकणार नसलात तरी सुद्धा इथल्या पाताळयंत्री अजस्त्र महाकाय शक्तीविरोधात जी लढाई आपण उभी केलेली आहे ; त्या लढाईला वैचारिक रसद या दोन महिन्यांत सुद्धा आपण पुरवत राहणार आहात,असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.
सन्माननीय पक्षप्रमुखांवर चौफेर हल्ले होत असताना छातीचा कोट करून आपण हा शिवसेनेचा गड वाचवण्यासाठी उभे राहिलात… खऱ्या अर्थाने मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणजे नेमकं काय हे आपल्याकडे बघितल्यावर महाराष्ट्राला कळतं… आपण ठणठणीत बरे होणार आहात.. आपल्यासोबत फक्त महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचेच नाही तर इथला प्रत्येक दबलेला पिचलेला आणि भाजपच्या दंडेलशाहीने मेटाकुटीस आलेला प्रत्येक माणूस आपल्यासारख्या लढाऊ शिलेदारासाठी ठामपणे उभा आहे या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत.. आपल्याला उदंड आयुष्य लाभो..! आम्ही सगळे आपली वाट बघत आहोत..असंही सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
संजय राऊतांची पोस्ट…
संजय राऊत यांच्या पुढील दोन महिन्यांसाठी सार्वजनिक जीवनापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृतीमध्ये झालेल्या बिघाडाच्या कारणास्तव त्यांनी कार्यकर्त्यांना आणि मित्रांना उद्देशून पत्र लिहीत पुढील दोन महिन्यांसाठी गर्दीमध्ये मिसळणे आणि बाहेर जाण्यासाठी डॉक्टरांकडून निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे नववर्षाला सुरुवातीला आपण भेटू असं त्यांनी म्हटलं आहे.


