{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
अमरावती (प्रतिनिधी) संजय सरवटकर
अमरावती (प्रतिनिधी) – दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी अंजनगाव सुर्जी येथील सिताबाई संगई विद्यालय (DC-28) कस्टडी परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पेपर कस्टडी प्रमुखा सह तीन जण आणि दोन अनोळखी विद्यार्थ्यां विरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर सकाळी 11 ते दुपारी 2.10 या वेळेत पार पडला. मराठी माध्यमाच्या 1992, इंग्रजी माध्यमाच्या 443 आणि उर्दू माध्यमाच्या 431 अशा एकूण मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका मोजणीदरम्यान दोन उत्तरपत्रिका संशयास्पदरीत्या कमी आढळल्या.
तपासणीदरम्यान एका कर्मचाऱ्याच्या पॅंटमध्ये दोन उत्तरपत्रिका लपविल्याचे आढळून आले. ही बाब निदर्शनास येताच संबंधिताला ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत परिक्षा कस्टडी प्रमुख आणि परिक्षा उपकस्टडी प्रमुख यांच्या हलगर्जीपणासह संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषद माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रजनी नारायण शिरभाते (वय 50) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी भादंवि कलम 316(5), 318(3)(4), 61(2)(A) तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर परीक्षांतील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम 1982 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे (वय 57), शिक्षण विस्तार अधिकारी सुशील कुमार अभ्यंकर (वय 55), अनिल हाडोळे (वय 45) यांचा समावेश असून दोन अनोळखी विद्यार्थ्यांचाही शोध सुरू आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करीत आहेत.
