मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच निवडणूक घेण्यात यावी अशी विरोधकांची मागणी असताना राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
यावेळी माध्यमांनी मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार, चुकीचे पत्ते यावरुन निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रश्न उपस्थित केले. त्यावर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं असल्याचे म्हटलं. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना त्यांना अपेक्षित असलेले उत्तर मिळणार नाही, असं म्हटलं.
राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दुबार मतदारांसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल तर तुमचा उपयोग काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला. त्यांना दुसरे कुठलेही उत्तर अपेक्षित नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेले उत्तर मिळू शकत नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
“आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १०० टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ?
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन,” असं राज ठाकरे म्हणाले.


