राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ नं निवडणूक आयोगाची उडाली झोप !
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. एकच फोटो वापरून १०० विविध नावांनी मतदार नोंदवले जातात. एकाच मतदारसंघात असे हजारो लोक आहेत.
जे उत्तर प्रदेशातही मतदान करतात, तेच हरियाणातही मतदान करतात असं सांगत राहुल गांधी यांनी प्रत्येक गोष्टीचे पुरावे मांडले. हरियाणात जवळपास २५ लाख मतांची चोरी केली गेली असा आरोप काँग्रेसने केला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतचोरीबाबत प्रेंझेटेशन केले. त्यात एका घरात ५०० मतदारांची नोंदणी केली जाते. १० पेक्षा जास्त मतदार एकाच घरात असतील तर नियमानुसार तिथे निवडणूक आयोगाचे कर्मचारी जाऊन तपास करतात. परंतु जाणुनबुजून निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करते. एका एका घरात ५०, १०० मतदार आढळतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले होते, मात्र काही मतदारांची नावे विधानसभेत वगळण्यात आली. ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून मतदान केले जाते. ब्लर फोटो वापरले जातात. भाजपाच्या यूपीतील सरपंचाकडून हरियाणातही मतदान केले जाते. हरियाणात काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आला असा आरोप त्यांनी केला.
तसेच निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपा मतांची चोरी करत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणूक आयोगातील लोकांनी मिळून देशातील लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही हीच सिस्टम लागू करण्यात आली आहे. आम्ही देशातील युवकांना पुराव्यासह दाखवू शकतो, निवडणूक आयोगाने काढलेली यादी आहे. त्यात दुबार, बोगस मतदार आहेत. आमच्याकडे व्यवस्था नाही, कारण यंत्रणा त्यांच्या हातात आहे. देशाची लोकशाही उद्ध्वस्त केली आहे. आम्ही आतापर्यंत विविध पुरावे मांडले. ही लोकशाही देशातील जनतेची आहे. त्याचे रक्षण करणे तुमची आणि आपली जबाबदारी आहे असं आवाहन राहुल गांधी यांनी Gen Z युवकांसह देशातील जनतेला केले.
दरम्यान, मतदार यादी भ्रष्ट असेल आणि आम्हाला शेवटच्या क्षणी मतदार यादी दिली जात असेल तर फायदा नाही. मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. आम्ही लोकांना जागरूक करू शकतो, परंतु कायदेशीरपणे ५-५ वेळा नावे यादीत येत असतील. निवडणुकीसाठी मतदार यादीचा वापर होत असेल आणि भ्रष्ट यादीच पुढे येत असेल तर आम्ही काय करू शकत नाही. कुठलाही राजकीय पक्ष काहीच करू शकत नाही. हा सगळा मतदार यादीचा डेटा निवडणूक आयोगाचा आहे. हा आमचा डेटा नाही. आम्ही दाखवलेले प्रेझेंटेशन सुप्रीम कोर्टही पाहतोय. त्यामुळे आम्ही कुणापासून लपून काही करत नाही. हे सगळे देशाच्या जनतेसमोर मांडले जात आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.


