काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राहुल गांधींनी दावा केला होता की ते ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार असून हरियाणामध्ये मतदानात मोठ्या प्रमाणावर बनावट मतं टाकण्यात आली आहेत.
त्यांनी आरोप केला की हरियाणामध्ये तब्बल 25 लाख खोट्या मतांची नोंद झाली. इतकंच नव्हे तर एका ब्राझिलियन मॉडेलच्या फोटोंचा दाखला देत त्या महिलेनं 22 वेळा मतदान केलं असंही ते म्हणाले.
राहुल गांधींच्या या गंभीर आरोपांवर आता भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटलं की, ‘ही पत्रकार परिषद माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारी आहे. कारण बोलायला काही मुद्दाच नाही. चांगला मुद्दा असला की बोलायला आवडतं. पण राहुल गांधी यांच्या बिनबुडाच्या आरोपांवर काय बोलायचं?
‘बिहारमध्ये त्यांचं काही उरलेलं नाही’
रिजिजू पुढे म्हणाले की, ‘राहुल गांधी एका महिलेचा फोटो टी-शर्टवर दाखवत फिरले आणि नंतर त्या महिलेनंच त्यांना फटकारलं. ते बनावट नाव, बनावट गोष्टींवर बोलतात. आता बिहारमध्ये मतदान सुरू आहे. पण ते त्याकडे दुर्लक्ष करून हरियाणाची कथा सांगत आहेत. कारण बिहारमध्ये त्यांचं काही उरलेलं नाही.’ केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्या परदेशातील दौऱ्यांवरही टीका केली.
ते म्हणाले, ‘पार्लमेंट चालू असताना राहुल गांधी परदेशात फिरत असतात. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना गंभीर विषयांवर बोलायला हवं पण ते अवास्तव आरोप करत आहेत. हरियाणाच्या एग्झिट पोल्स आणि ओपिनियन पोल्समध्ये काँग्रेस पुढे होती पण निकालात हरली. त्यामुळे आता ते निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित करत आहेत.’
‘राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब कधीच फुटत नाही’
रिजिजूंनी पुढे म्हटलं की, ‘राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब कधीच फुटत नाही. ते नेहमीच खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगतात. देशातील जनता आनंदी आहे. पण अडचण फक्त राहुल गांधींनाच आहे.या वक्तव्यांमुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील शाब्दिक चकमक अधिकच तीव्र झाली असून बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


