मुरलीधर मोहळांवर धक्कादायक आरोप; शहरातील गंभीर घटनेत घेतलं नाव…
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीवरून शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर पुण्यात महायुतीतील संघर्ष टोकाला गेला होता.
याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालत रवींद्र धंगेकर यांना महायुतीत दंगा नको अशा सूचना केल्या होत्या. पुढे जैन बोर्डिंग हाऊसिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरील आरोपांची मालिका थांबवली होती. तर आमचं आता ठरलं आहे, मी नाव घेणार नाही, असं म्हणत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करणे बंद केलं होतं. मात्र, काल धंगेकर हे मुंबई मधून जाऊन आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करत गंभीर आरोप केले आहेत.
पौडफाटा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहळांच्या गुंडाने हल्ला केला असल्याचा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. “मुरलीधर मोहोळ यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्त केलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत 30 ते 40 साथीदारांसह मेगा सिटी वस्तीमध्ये घुसून समीर चव्हाण, सनी चव्हाण यांसह वस्तीतील महिलांवर हल्ला केला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो बाकी गुन्हेगारीची पाळेमुळे इथेचआहेत,” असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान, “रफिक नावाच्या एका व्यक्तीने एका वस्तीतील काही महिलांना मारहाण केली आहे. हा रफिक नामक व्यक्ती भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचा सरचिटणीस आहे. त्याचं अभिनंदन केल्याचं पत्र आणि फोटोही मी पोस्टमध्ये टाकले आहेत. हाच व्यक्ती कोथरूडमध्ये काही बिल्डरांबरोबर काम करतो,” अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी दिली आहे.
रवींद्र धंगेकर हे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी मुरलीधर मोहोळ यांचा थेट संबंध असल्याची टीका रवींद्र धंगेकर यांनी केली होती. त्यानंतर जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहारामध्ये असणाऱ्या गोखले बिल्डरसोबत मोहोळ यांचे हितसंबंध असून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर गोखले यांच्या फायद्यासाठी केल्याचा आरोपही रवींद्र धंगेकर यांनी केला होता. इतकंच नाही तर महापौरपदाच्या कार्यकाळादरम्यान मोहोळ यांनी बढेकर बिल्डरची गाडी महापौरांची गाडी म्हणून वापरल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. या आरोपांच्या मालिकेनंतर आता रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावरच गुन्हेगार पोसण्याचा गंभीर आरोप करत एकच खळबळ उडून दिली आहे.


