उद्धव ठाकरेंचा घणाघात !
अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची अमीडिया होल्डिंग्स एलएलपी नावाची कंपनी आहे. या कंपनीने पुण्यातील कोरगाव पार्कमध्ये असलेला एक मोठा भूखंड खरेदी केला.
१८०० कोटी किंमत असलेला हा भूखंड फक्त ३०० कोटी रुपयात खरेदी करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणावर बोलताना शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन घोटाळा प्रकरणावर टीका केली.
“स्वस्तात, फुकटात जमिनी घेऊन…”
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण मराठी-अमराठी करतो. तुम्ही-आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे चलेचपाटे, मुलं-बाळं जमिनी ढापून, जमिनी लाटून स्वस्तात, फुकटात जमिनी घेऊन यांचे बंगले हे शेतकऱ्यांच्या उरावर बांधतात”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पार्थ पवारांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणावर केली.
मला कोणाच्या मुला-बाळाच्या प्रकरणावर बोलायचं नाहीये. आधी शिंदेच्या लोकांचे प्रकरण बाहेर येत होते. आता अजित पवाार यांच्या मुलाचे प्रकरण बाहेर आले आहे. आता मिडिया विचारत आहे, तुमची प्रतिक्रिया काय? मी सांगतो यात काही होणार नाही. चौकशी करतील आणि क्लीन चिट मिळेल. ते जमिनी कमावतील आणि तुम्ही बसा असेच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार अशा कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालतील असे माझे मत नाहीये. याबद्दल आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. अनियमितता झाली आहे का? हे पडताळून पाहिले पाहिजे. अनियमितता झाली असेल, त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.
अजित पवारांचे मौन
पार्थ पवार यांच्या कंपनीचे जमिनी खरेदी प्रकरण समोर आल्यापासून अजित पवारांनी बोलणं टाळलं आहे. पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार माध्यमांना न बोलताच निघून गेले.


