शिल्लक राहिलेल्या काँग्रेससाठी उदयसिंह उंडाळकरांचा गळ ?
मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचा भाजप प्रवेश नाममात्र राहिला आहे. त्यामुळे येथील काँग्रेसच्या अभेद्य गडालाच खिंडार पडल्याची अवस्था आहे.
यानंतर मलकापुरात नव्या राजकारणाचा उदय होण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त होत आहे. काँग्रेसचे काही निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासोबतही जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीची तेथे चाचपणी सुरू आहे. काही जण अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातील, त्यांनाही उंडाळकर गट ताकद देणार का? याची उत्सुकता लागून आहे.
राजकीय उलथापालथ शक्य :
मलकापुरात मोठ्या राजकीय उलथापालथ झाल्या आहेत. तेथे काँग्रेससह पक्षाच्या निष्ठावंतांना वाली कोण? अशा प्रश्न उपस्थित होत आहे. मलकापुरात निर्माण झालेली राजकीय स्थिती नव्या समीकरणाला जन्म देण्याची शक्यता पुढे येत आहे. येथील पालिकेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते ॲड. उंडाळकरांना मोठी संधी आहे.
उंडाळकर यांना मानणारा गटही तेथे आहे. त्या गटाला राजकीय संधी उपलब्ध झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे काँग्रेस न सोडणारे समर्थक व कार्यकर्ते अपक्ष किंवा उंडाळकर गटाबरोबर हात मिळवणी करून निवडणूक लढतील, अशी सध्याची स्थिती आहे. काही जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष निवडणूक लढवणार आहे.
निष्ठावंत ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत :
मलकापुरातील काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते मनोहर शिंदेही भाजपच्या उंबरठ्यावर असल्याने येथे काँग्रेस खिळखिळी झाली. येत्या काही दिवसांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आमदार डॉ. भोसले यांच्या भाजपविरोधात लढण्यासाठी सक्षम विरोधक नाही, अशी स्थिती सध्या आहे.
शिंदे व काँग्रेसचे जवळचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे मलकापुरातील स्थानिक निष्ठावंत ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. भाजपचे पारडे जड असतानाच दुसरीकडे उंडाळकर गटाला संधी आहे. शिंदेंचा निर्णय न पटलेल्या काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्ते समर्थकांना उंडाळकर गटाचा पर्याय शिल्लक आहे.


